दुचाकीस्वार हवेत उडून पडला मांडवी नदीत रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम जारी
पणजी : येथील मांडवी पुलावर झालेल्या अपघातात बेशिस्त आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत येत असलेल्या रेंट-अ-कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना काल गुरुवारी सायंकाळी घडली आहे. रेंट-अ-कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या टक्करीत दुचाकीस्वार हवेत उडून मांडवी नदीत पडला. रात्री उशिरापर्यंत पोलीस त्याचा शोध घेत होते. कार चालकाविराधात गुन्हा नोंद करून त्याला ताब्यात घेतले आहे. त्याला किरकोळ जखम झाली आहे. याबत पणजी पोलिसांना माहिती मिळताच पणजी पोलिसांसह अधीक्षक अक्षत कौशल, उपअधीक्षक सुदेश नाईक, निरीक्षक विजय चोडणकर घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मांडवी नदीत पडलेल्या दुचाकीस्वाराला शोधण्यासाठी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. शोध आणि बचाव कार्य करण्यासाठी अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, नौदल आणि तटरक्षक दलाला पाचारण करण्यात आले आहे.
तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने उ•ाण केले आणि नौदलाच्या खोल समुद्रातील गोताखोरांनाही पाचारण करण्यात आले आहे, दुचाकीस्वाराचे हेल्मेट जप्त करण्यात आले आहे. जीए-03-व्ही- 1709 क्रमांकाची रेंट-अ-कार घेऊन अंकीत त्रिपाठी (30 ओडिशा) हा काही पर्यटकांना म्हापसाहून पणजीच्या दिशेने घेऊन येत होता. जीए-03-ई-4147 क्रमांकाची हिरो होंडा घेऊन जावेद सडेकर (38 वर्षे, हळदोणा) हा विऊध्द दिशेने जात होता. दोन्ही वाहने मांडवी पुलावर पोचली असता रेंट-अ-कार समोरच्या गाडीला ओव्हरटेक करून चुकीच्या दिशेने भरधाव पुढे आली आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की दुचाकीचा चक्काचूर झाला. दुचाकीस्वार हवेत उसळून मांडवी नदीत पडला. मांडवी पुलावरील घटनेची माहिती वाऱ्याच्या गतीने गोवाभर पसरली आणि रेंट-अ-कारच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सरकारने रेंट-अ-कार त्वरित बंद कराव्यात, अशी मागणीही होत आहे.









