मुंबई
अल्लू अर्जुनच्या आगामी पुष्पा 2 :द रुल या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. तसा याच वर्षी डिसेंबर महिन्यात विकी कौशलचा ऐतिहासिक छावा हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पुष्पा २ आणि छावा या दोन्ही सिनेमे डिसेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित होणार होते. दरम्यान छावा चित्रपटाच्या निर्मात्यांनी सिनेमा प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलली.
पुष्पा च्या पहिल्या पार्टला मोठ्या प्रमाणात यश मिळाले होते. या सिनेमाचे फॅन्स आता दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा ५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. विकी कौशलची प्रमुख भूमिका असणारा ‘छावा ‘हा सिनेमा डिसेंबर महिन्याच्या ६ तारखेला प्रदर्शित होणार होता. पण निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आणि या दोन सिनेमातला संघर्ष टळला.
तरूण आदर्श यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडेल वरून छावा सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखे विषयी माहिती दिली. छावा सिनेमाचे प्रदर्शन दोन महिने लांबणीवर गेले असून १४ फेब्रुवारी २०२५ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
पुष्पा २ आणि छावा या दोनही सिनेमांमध्ये रश्मिका मंधाना असल्याने तिच्यासाठीचा दोन्ही सिनेमे एकमेकांसमोर येण्याचा संघर्षाचा प्रसंग टळला. दिनेश विजन निर्मित आणि लक्ष्मण उटेकर दिग्दर्शित छावा सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.









