वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्रत्येक वर्षी 14 सप्टेंबर हा दिवस ‘हिंदी दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदीचा सर्व भारतीय भाषांशी अतूट संबंध आहे, असे प्रतिपादन या दिनाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. भारतातील सर्व भाषा या भारतासाठी समान प्रतिष्ठेच्या आहेत. या भाषांना समृद्ध केल्याशिवाय भारत प्रगतीपथावर अग्रेसर होऊ शकत नाही, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
यावर्षी हिंदी भाषेने सार्वजनिक संपर्काची भाषा या नात्याने 75 वर्षे पूर्ण केली आहेत. हिंदी भाषेमुळे देशाची एकात्मता अधिक दृढ झाली आहे. हिंदी अधिकृत राष्ट्रीय भाषा असून ती यापुढेही भारताच्या प्रगतीच्या निर्धारात आपले अमूल्य योगदान देत राहील, असे प्रतिपादनही अमित शहा यांनी याप्रसंगी केले.









