नियोजनासंदर्भात बैठकीचे आयोजन
बेळगाव : बेळगावसह इतर सर्वच उपनोंदणी कार्यालये शनिवार व रविवारी साप्ताहिक सुटीदिवशीही सुरू ठेवली जाणार आहेत. आलटून पालटून कार्यालये सुरू ठेवली जाणार असल्याचा निर्णय मुद्रांक आणि महसूल खात्याने घेतला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसंदर्भात सोमवारी बेळगाव उपनोंदणी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला क्रेडाई बेळगावचे पदाधिकारी उपस्थित होते. उपनोंदणी कार्यालयाच्या सुटीदिवशीच्या नियोजनासंदर्भात झालेल्या बैठकीला बेंगळूर येथील मुद्रांक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी यापुढे साप्ताहिक सुटीदिवशी उपनोंदणी कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत.
यामुळे नागरिकांना शनिवार, रविवारीही मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार आहेत. नोंदणी अधिकारी पट्टादार यांनी बेंगळूर येथील अधिकारी व क्रेडाईच्या सदस्यांचे स्वागत केले. साप्ताहिक सुटीदिवशी ज्या तालुक्यातील उपनोंदणी कार्यालय सुरू असेल त्या ठिकाणी जाऊन मालमत्तांची खरेदी-विक्री करता येणार आहे. या निर्णयामुळे बांधकाम व्यावसायिकांचा लाभ होणार असल्याने सरकारच्या निर्णयाबाबत क्रेडाईने अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी, सुधीर पनारे, डी. ए. सायनेकर, राजेश माळी, राजेंद्र मुतगेकर, उपनोंदणी अधिकारी आनंद यासह बेळगाव जिह्यातील उपनोंदणी कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









