मनपा आयुक्तांना जलाशय पाहणीच्या सूचना
बेळगाव : शहरामध्ये पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पावसाने ओढ दिल्याने समस्या आणखी गंभीर बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रादेशिक आयुक्तांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांना राकसकोप जलाशय तसेच हिंडलगा पंपिंग केंद्र आणि बसवनकोळ येथेही भेट देण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्यांनी या तिन्ही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे. मान्सूनचे आगमन झाले तरी म्हणावा तसा पावसाला जोर नाही. त्यामुळे नदी, नाले, जलाशये, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. येत्या चार दिवसांत पाऊस झाला नाही तर शहरासह जिल्ह्यामध्येही पाण्याची समस्या गंभीर बनण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे प्रादेशिक आयुक्तांनी गांभीर्याने याची दखल घेतली आहे. मनपा आयुक्तांना तातडीने पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही त्रुटी असतील तर त्या तातडीने दूर करण्याबाबत पाऊल उचलावे, अशी सूचना देण्यात आली आहे. एकूणच शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन नियोजन करण्याबाबत अधिकाऱ्यांना सक्त आदेश दिल्याचे सांगण्यात आले.
राकसकोप जलाशयाची मनपा आयुक्तांकडून पाहणी
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची पाणीपातळी खालावली आहे. डेडस्टॉकमधील पाणी उपसा करण्यासाठी एका 50 एचपी मोटारीचा वापर सध्या करण्यात आला आहे. बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी बुधवारी दुपारी जलाशयाला प्रत्यक्ष भेट देऊन पाणीपातळीची पाहणी केली. जलाशयाची पाणीपातळी 2447.10 फूट इतकी आहे. बुधवारीही जलाशय पाणलोट क्षेत्रात तुरळक प्रमाणात पाऊस झाल्याने पाणीपातळीत वाढ झाली नाही. परिसरात अजूनही पावसाचा जोर नसल्याने जलाशयाला मिळणाऱ्या नदी आणि नाल्यातून पाणी प्रवाहित झाले नाही. त्यामुळे पाणीपातळी खालावत चालली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याबरोबरच शहर पाणीपुरवठा मंडळाचे कार्यकारी अभियंते अशोक शिरुर, सेक्शन ऑफिसर मंजुनाथ सी., केयुआयएफडीसीचे अधिकारी अशोक बरकुले, उपकार्यकारी अभियंते शशीकुमार हट्टी, एलअॅण्डटी कंपनीचे रविकुमार, श्री गोमती उपस्थित होते.









