गोरगरीब रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा देण्याच्या सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
बिम्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही, सरकारी इस्पितळात येणाऱ्या गरीब व निर्गतिकांवर उत्तम प्रकारचे उपचार देणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे सर्व विभागात रुग्णांवर उत्तम उपचार द्यावेत, अशी सूचना प्रादेशिक आयुक्त जानकी के. एम. यांनी बिम्स प्रशासनाला केली आहे.
शुक्रवारी बिम्सला भेट देऊन तेथील प्रशासकीय मंडळाची बैठक घेतली. यावेळी प्रादेशिक आयुक्तांनी बिम्स प्रशासनाला कडक शब्दात सूचना दिल्या आहेत. बिम्स नागरिकांना उपचार देण्यात आघाडीवर आहे. सरकारी इस्पितळातही उत्तम सोयी-सुविधा व उपचार मिळतात, हे बिम्सने दाखवून दिले आहे. तरीही उपचार करताना कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये, नम्रपणे रुग्णसेवा करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
बिम्समधील सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत वेगवेगळ्या विभागांना भेट देऊन त्यांनी स्वत: पाहणी केली. यावेळी बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. सिद्धू हुल्लोळी, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. केशव एच. बी. यांच्यासह बिम्सचे इतर विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.









