व्यापारी संघटनेने केली होती पालिकेकडे तक्रार : आठवडी बाजाराचा दिवस असल्याचे कारण : वाहतूक खोळंबण्याच्या शक्यतेने घेतला निर्णय
विशेष प्रतिनिधी / पणजी
राज्य विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी 16 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या सांखळी मतदारसंघात म्हादई वाचवा आंदोलनांतर्गत काही विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या आंदोलन तथा जाहीर सभेला सांखळी नगरपालिकेने दि. 9 जानेवारी रोजी दिलेली परवानगी मुख्याधिकारी कबिर शिरगावकर यांनी आता मागे घेतली आहे. सोमवार हा बाजाराचा दिवस असल्याने वाहतूक व्यवस्थेत मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून परवानगी नाकारली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारवर कडक शब्दात टीका केली आहे.
सांखळी शहरातील पालिका मैदानावर राज्य विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काही विरोधी पक्षांनी ‘म्हादई वाचवा’ मोहिमेंतर्गत आयोजित केलेल्या सभेमुळे वाहतुकीची मोठय़ा प्रमाणात कोंडी होईल व त्याचा बाजारावर गंभीर परिणाम होईल, अशी भीती वजा तक्रार सांखळीतील व्यापारी संघटनेने सांखळी नगरपालिकेकडे केली होती. त्यानंतर मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी सायंकाळी सांखळीतील नागरिक आणि बाजारकरांची तक्रार लक्षात घेऊन दि. 9 रोजी सभा घेण्यासाठी दिलेले पालिका मैदान व दिलेली परवानगी मागे घेत असल्याचे कळविले आहे. त्याकरिता रु. 10 हजार भरलेली रक्कम परत घेऊन जावी, असे आयोजकांना कळविले आहे.
युरींची मुख्यमंत्र्यांवर टीका
दरम्यान, जीवनदायिनी म्हादईवर भाजप सरकारने विश्वासघात केला. त्याविरुद्ध जनक्षोभ सुरू झाल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे घाबरलेले आहेत. त्यामुळे त्यांनीच ही सभेची परवानगी नाकारलेली आहे, असे निवेदन करून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हादई जागोरच्या आंदोलनाने भाजप सरकारला जनतेसमोर गुडघे टेकवावेच लागतील, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे, अशी टीका केली आहे.
मुख्याधिकाऱयांचा एकतर्फी निर्णय ः सावळ
सांखळीचे नगराध्यक्ष राजेश सावळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की सांखळी येथे दि. 16 रोजी जी सभा होणार आहे त्या सभेसाठी सांखळी नगरपालिका मंडळाने आपल्या बैठकीत अधिकृतरित्या परवानगी दिली आहे. काही व्यापारी मंडळींनी पालिकेकडे तक्रार केल्यानंतर मुख्याधिकारी कबिर शिरगावकर यांनी पालिका मंडळाला विश्वासात न घेताच बाहेरच्या बाहेर परवानगी गुरुवारी सायंकाळी नाकारली. यामागे त्यांना कोणीतरी मोठय़ा व्यक्तीने आदेश दिलेले आहेत. कबिर यांनी पालिका मंडळाला विश्वासात घेणे आवश्यक होते. परंतु, त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतलेला आहे. हे पूर्णतः राजकारण आहे.
कबिर शिरगावकर यांनी पालिकेला येणार असलेले रु. 10 हजाराचे उत्पन्न बुडविले आहे. सांखळीतील व्यापारी संघटनेने वाट्टेल ती तक्रार करुद्या. ते बाजार चालवित नसतात. पालिका बाजार चालविते. आम्ही पार्किंगसाठी पर्यायी व्यवस्था केलेली होती. सभा घेण्यास आमची कोणतीही हरकत नाही, असेही नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी सांगितले.
सरकारला जनतेसमोर गुडघे टेकवावेच लागणार ः आलेमाव
जीवनदायीनी आई म्हादईवर भाजप सरकारने केलेल्या विश्वासघाताविरुद्ध उठलेल्या तीव्र जनक्षोभाने घाबरलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता ओपिनियन पोलच्या दिवशी ‘म्हादई वाचवा सभेची’ ची परवानगी रद्द केली आहे. आपण या कृत्याचा तीव्र निषेध करतो. म्हादई जागोरच्या आंदोलनाने भाजप सरकारला जनतेसमोर गुडघे टेकवावेच लागतील हे डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिला आहे.
गोवा भाजप सरकार केंद्र सरकारचे गुलाम
गोव्यातील भाजप सरकार केंद्रातील भाजप सरकारचे गुलाम बनले आहे. गोव्यातील भाजप आमदार दिल्लीतील नेत्यांना घाबरतात. केंद्र सरकार व भाजप हायकमांडाकडून आलेल्या फतव्यांनुसारच त्यांना वागावे लागते. प्रधानमंत्र्यांनी नकार दिल्यानेच केवळ नाटक करण्यासाठी गोव्यातील शिष्टमंडळाने गृहमंत्र्यांची भेट घेतली. सरकारच्या पदरी काहीच पडणार नाही हे मुख्यमंत्र्यांनाही माहीत होते म्हणुनच त्यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांना नेण्याचे टाळले, अशी टिपणीही आलेमाव यांनी केली.