33 सेकंदांमध्ये 10 कॅरोलिना रीपर केल्या फस्त
काही लोकांना झणझणीत खाद्यपदार्थ आवडत असतात. परंतु जगातील सर्वात तिखट मिरची खाणे सर्वांनाच शक्य नाही. याप्रकारच्या एका मिरचीचा वापर करत शेकडो लोकांसाठी स्वयंपाक केला जाऊ शकतो. परंतु एका व्यक्तीने 1-2 नव्हे तर 10 कॅरोलिना रीपर फस्त केल्या आहेत आणि त्या देखील केवळ 33 सेकंदांमध्ये. कॅरोलिना रीपरला 2017 मध्ये जगातील सर्वात तिखट मिरची असण्याचा मान मिळाला होता.
कॅलिफोर्नियातील ग्रेगरी फोस्टरने सर्वात तिखट मिरची खाण्याचा विक्रम केला आहे. सर्वात कमी वेळेत सर्वाधिक कॅरोलिना रीपर मिरची खाण्याचा विक्रम ग्रेगरीच्या नावावर असल्याची माहिती गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दिली आहे. ग्रेगरी अत्यंत तिखट खाद्यपदार्थांचे सेवन करण्यासाठी ओळखले जातात.

ग्रेगरी हे छोट्या आणि अन् काहीशा गोड प्रजातीच्या मिरची खाण्याचा सराव करून स्वत:ला प्रशिक्षित करत असतात. ग्रेगरी हे एका हॉट सॉस कंपनीचे मालक असून त्यांना शेतीचीही आवड आहे. ते स्वत:च्या शेतात देखील मिरचीचे पीक घेतात. सर्वात तिखट मिरची खाण्याचा वेगळाच आनंद असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ग्रेगरी यांच्यासमोर विक्रम नोंदविण्यासाठी अमेरिकेतील मिच डोनेली यांचे आव्हान होते. डोनेली यांना कॅरोलिना रीपर प्रेमी म्हटले जाते आणि ते फूटबॉल प्रशिक्षक देखील आहेत. दोघांनी एकाचवेळी मिरच्या खाण्यास सुरुवात केली, यानंतर ढेकर, घाम अन् उलट्यांदम्यान ग्रेगरी यांनी तिखटपणा सहन करण्याची आपली क्षमता सर्वाधिक असल्याचे सिद्ध करून दाखविले. हा प्रकार अत्यंत मनोरंजक असून मला ही वेदना पसंत आहे. एवढ्या मिरच्या खाल्ल्यावर होणारा त्रास हा पेटता निखारा जिभेवर धरल्यासारखा असतो असे ग्रेगरी यांनी म्हटले आहे.
धगधगत्या लाव्हारसाप्रमाणे स्वाद
ग्रेगरी यांनी या मिरच्यांच्या स्वादाबद्दलही सांगितले आहे. कॅरोलिना रीपर मिरचीचा स्वाद फळासारखा आहे. प्रारंभी चावून खाल्ल्यावर ती गोड वाटते, परंतु काही क्षणातच लाव्हारस तोंडात धरल्यासारखे वाटू लागते असे त्यांनी सांगितले आहे.









