रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी आपला जगभरातील डोलारा सांभाळण्यासाठी खासगी सेना उभी केली होती. जगाला अपरिचीत असलेली ही खासगी सेना युक्रेन युद्धात प्रामुख्याने प्रकाशझोतात आली. पुतीन यांनी विकसीत केलेली ही सेना आज दहा देशात कार्यरत असून या सेनेचे प्रमुख असलेल्या येवेगोनी प्रिगोजीन आणि डिमित्री उटकीन द्वयींनी गेल्या जून महिन्यात केलेल्या बंडाचा परिणाम म्हणून गेल्या आठवड्यात त्यांचा विमान अपघातात मृत्यू घडवून आणला..
रशिया युक्रेन युद्धावेळी व्हॅगनर समुहाचे नाव बऱ्याचवेळा चर्चेत आले होते. व्हॅगनर समुहाचे लढवय्ये रशियाच्या बाजूने युक्रेनला टक्कर देत असल्याच्या बातम्या प्रसारीत होत असत. युक्रेन युद्धाला सव्वावर्ष झालेले असतानाच अचानकपणे जूनमध्ये व्हॅगनर समुहाचे प्रमुख येवेगोनी प्रिगोजीन यांच्या नेतृत्वाखाली या लढवय्यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात मॉस्कोच्या रस्त्यावर रणगाडे उतरवले. त्यांच्या या बंडखोरीने रशियाचे सैन्य हडबडले, मात्र केवळ आठ दहा दिवसांत बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या मध्यस्थीनंतर व्हॅगनर समुहाचे बंडखोर जवान आपल्या बंकरमध्ये परतले.
ब्लादिमीर पुतीन हे रशियाचे गुप्तहेर असताना एका चहाच्या टपरीवर नेमाने चहा पिण्यासाठी नियमीत जात असत. या टपरीचे मालक असलेल्या येवेगोनी
प्रिगोजीन यांच्याशी त्यांची गट्टी जमली होती. पुतीन यांनी दोन दशकांपूर्वी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदावर आरुढ झाल्यानंतर त्यांनी आपला जागतिक डोलारा सांभाळण्यासाठी खासगी सेना उभी करण्याचा बेत आखला. त्यानुसार त्यांनी त्यावर काम करण्यास सुरुवात केली. अखेर त्यांना आपल्या हेरगिरीच्या कार्यकाळात गट्टी जमलेल्या चहाच्या टपरीचे मालक येवेगोनी प्रिगोजीन यांची आठवण झाली. येवेगोनी प्रिगोजीन हे करारी आणि कोणतेही धाडस करण्याची तयारी असलेला लढवय्या योद्धा असल्याचे केजीबीचे अधिकारी असलेल्या पुतीनच्या नजरेने हेरलेले होते. त्यावेळी त्यांनी प्रिगोजीन यांच्याकडून काही अवघड कामगिऱ्या खासगीरित्या पूर्ण करून घेतल्या होत्या.
प्रिगोजीन यांनी उभी केलेली खासगी सेना पुतीनच्या आशीर्वादाने नेमकी कोणत्या वर्षी स्थापन झाली हे माहित नसले तरी 2014 साली रशियाने युक्रेनचा क्रिमिया हा प्रांत गिळंकृत केला होता. रशियाने अचानकपणे केलेल्या या हल्ल्यात व्हॅगनरच्या बंडखोरांचा सक्रिय सहभाग होता. क्रिमिया युक्रेनपासून तोडल्यानंतर अमेरिकेसहीत युरोपियन देश पूर्णपणे हतबल झाले होते. या घटनेनंतर प्रिगोजीन यांच्या नेतृत्वाखालील व्हॅगनर समूह प्रकाशझोतात आला. त्यानंतर या बंडखोर समुहाला रशियन सर्वेसर्वांनी मोठी कामगिरी सोपविली. पुतीन यांनी या समुहाला सिरीयात नेमले. पुढे आफ्रिकेतील चार देशांत त्यांची तैनाती केली. आता हा गट दहा देशांत आपले पाय पसरून कार्यरत आहे.
गेल्या सहा दशकांपासून अमेरिका आणि रशिया यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरु आहे. दोन्ही देश महासत्तेच्या नशेत जगभरातील देशांना आपल्या कळपात ओढण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या गटात सामिल असलेल्या या देशांत आपले सैन्य तैनात करण्यात येत असत. अमेरिका आजही आपले तळ राखून आहेत. पण गेल्या तीन दशकांत रशियाची शक्ती क्षीण झालेली असून आपल्या गटातील सदस्य देशांत सैन्य तैनाती करणे अवघड होऊन बसले होते. यासाठी रशियाचे सर्वाधिक काळ राष्ट्राध्यक्ष असलेले ब्लादिमीर पुतीन यांनी भाडेपट्टीवर खासगी सैन्याची निर्मिती केली. पुतीन यांच्या सुपीक डोक्यातून बाहेर आलेल्या कल्पनेतूनच रशियात व्हॅगनर समुहाची स्थापना झाली. या व्हॅगनर समुहात जगभरातील विविध देशातील लढवय्या जातींना आकर्षित करण्याचे काम व्हॅगनरचे संस्थापक कमांडर डिमित्री उटकीन करत असत. नेपाळमधील गोरखा जातीतील लढवय्यांचा या समुहात समावेश आहे. तर या समुहाचे संस्थापक प्रिगोजीन समुहाचा आर्थिक भार सांभाळत असत.
व्हॅगनर समुहातील जवानांची सर्वाधिक संख्या डिसेंबर 2022 मध्ये 50 हजारपेक्षा अधिक झाली होती. या गटाची एप्रिल 2022 मध्ये संख्या होती केवळ आठ हजार व डिसेंबर 2017 मध्ये हे संख्याबळ सहा हजार होते. तर स्थापनेच्यावेळी 2014 मध्ये व्हॅगनर जवानांची संख्या फक्त 250 एवढी होती. सद्यस्थितीत व्हॅगनर समूह जवळपास दहा देशांत कार्यरत असून त्यात रशिया, युक्रेन, बेलारुस, मोझांबिक, सिरीया, सुदान, माली, मॅडागास्कर, नायझेर आदी देशांत कार्यरत आहेत.
खासगी लष्करी समुहाच्या नेतृत्वाने 23 जून 2023 रोजी रशियन सरकारला आव्हान दिले होते. आपली वाढती ताकत रोखण्यासाठी रशियन सैन्य व्हॅगनर समुहाच्या जवानांचा घात करत असल्याचा आरोप करत रशियाच्या रोस्टोव ओ डोन या शहरावर ताब मिळवत मोस्कोकडे कूच केली होती. मात्र राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी बेलारुसच्या मध्यस्थीने व्हॅगनर समुहाचे बंड थोपवून धरले. मात्र केवळ दोनच महिन्यांत 23 ऑगस्ट 2023 रोजी व्हॅगनरचे नेते येवेगोनी प्रिगोजीन आणि डिमित्री उटकीन प्रवास करत असलेल्या विमानात मोठा स्फोट होऊन अन्य आठ प्रवाशी आणि विमान चालकांसहीत मरण पावले. अशा तऱ्हेने आपल्या राजसत्तेला आव्हान देणाऱ्या व्हॅगनरच्या नेतृत्वाला यमसदनी पाठवून काटा काढला असून या गटाची सूत्रे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी आता आपल्या हाती घेतलेली आहेत.
प्रशांत कामत








