जमीनीवरही दिसू लागल्याने लोकांमध्ये भिती
वास्को : वाडे वास्कोतील साळकर कॉलनीजवळील तळ्यात भली मोठी मगर फिरताना दिसून लागल्याने स्थानिक लोकांमध्ये भिती पसरलेली आहे. काल सोमवारी ही मगर पुन्हा तळ्यातून खुल्या जमीनीवर आल्याने तेथील लोकांची भितीने गाळण उडाली. वाडेतील जुन्या कॉलनीजवळ पारंपरीक तळे असून सध्याच्या पावसामुळे हे तळे अधिकच भरलेले आहे. या तळ्यात मगरीचे वास्तव असून ही मगर हल्ली वरचेवर लोकांना दिसून येत आहे. रात्रीच्या वेळीही ती पाण्यातून वर येऊन फिरत असते. हा प्रकार या लोकवस्तीतील युवकांनी चित्रीत केलेला आहे. त्यामुळे समाज माध्यमांमधून या मगरीचे वृत सगळीकडे पसरलेले आहे. या लोकवस्तीतील रहिवासीयांनी या मगरीचा धसका घेतलेला आहे. या तळ्यापासून सभोवती बरीच घरे आहेत. लहान मुलेही तळ्याच्या आजुबाजुला खेळत असतात. या मगरीने या ठिकाणच्या एका मांजराला भक्ष केल्याचे बोलले जात आहे. भितीमुळे लोकांनी यासंबंधी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. त्यामुळे वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी या तळ्याला भेट देऊन पाहणी केली होती. मात्र, त्या मगरीला सुरक्षीतरीत्या ताब्यात घेण्यासाठी वनखात्याने अद्याप उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे लोकांमध्ये चिंता पसरलेली आहे. सोमवारी दिवसाढवळ्या ही मगर तळ्यातून जमीनीवर आल्याचे लोकांनी पाहिले. बराच वेळ ती जमीनीवरच होती. बाजुला एक मांजरही या मगरीचे निरीक्षण करत होते. मगरीमुळे निर्माण झालेली वाडेतील लोकांमधील भिती दूर करण्यासाठी तीला त्वरीत वनखात्याने ताब्यात घ्यावी अशी मागणी लोकांकडून होत आहे.









