सातारा / गौरी आवळे :
जिल्ह्यातील ३५ ते ४० या वयोगटातील महिलांमध्ये गर्भाशय काढण्याचे प्रमाण गेल्या तीन वर्षात वाढले आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयात तीन वर्षात ४३८ महिलांनी गर्भाशय काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच खासगी रूग्णालयातही गर्भाशय काढण्याचे प्रमाण वाढलेले आहे. परंतु त्याची आकडेवारी समोर आलेली नाही. त्यामुळे गर्भाशय काढण्याचा आकडा मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता आहे. हार्मोनल इम्बॅलन्स, थॉयरॉईड, आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष अशी प्रमुख कारणे असल्याने रूग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहेत.
बदलत्या काळाप्रमाणे महिलांच्याही जीवनशैलीत दिवसेंदिवस बदल होत आहे. घर, नोकरी व इतर जबाबदाऱ्या पार पाडताना वाढता ताण थेट आरोग्यावर परिणाम करत आहेत. इतर वयोगटातील महिलांच्या तुलनेत ३५ ते ४० वयोगटातील महिलांमध्ये आरोग्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. हार्मोनल इम्बॅलन्स, थॉयरॉईड यामुळे मासिक पाळी ही अनियंत्रित होऊन अतिरक्तस्त्राव होतो. दर महिन्याला जादा रक्तस्त्राव झाल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. काही दिवस अंगावर काढण्यात येते. परंतु दर महिन्याला हा त्रास होतच असल्याने स्त्रीरोग तज्ज्ञाकडे तपासणी केली जाते.
यावेळी फायब्रॉईड, एडेनोमायोसिस, मायोमेट्रियम, सिस्टोसेल, डिसफंक्शनल युटेरिन ब्लीडिंग अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडून औषध उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो. परंतु सर्वसामान्य कुंटुंबातील महिला काही दिवस औषधे घेतात. या औषधाचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर असून दर महिन्याला हा त्रास नको असतो. तसेच गर्भाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. या सर्व बाबीचा विचार डॉक्टरांकडून केला जाते. आणि महिला, नातेवाईक ही गर्भपिशवी काढण्यात यावी, अशी मागणी डॉक्टरांकडे करतात. त्यानुसार ऑपरेशन केले जाते.
- ही आहेत कारणे
शरीरात हार्मोन्सचं असंतुलन झाल्यास थकवायेतो, लक्ष केंद्रित करणं अशक्य होतं, भरपूर घाम येतो, वजन वाढतं किंवा कमी होतं, चेहऱ्यावर पिंपल्स येतात, मानसिक तणाव, नैराश्य येतं, वंध्यत्व, अनियमित मासिक पाळी, जादाचा रक्तस्त्राव, केस गळती, हृदयाच्या ठोक्याच्या गतीमध्ये बदल, हायपरटेन्शन, डायबेटीस अशी लक्षणं दिसून येतात. त्यामुळे महिला ऑपरेशकडे वळतात.
- अशी घ्या काळजी
ही समस्या उद्भवण्यामागे तणावसुद्धा कारणीभूत आहे. महिलांच्या शरीरातील हार्मोन्सच्या नैसर्गिक सायकलला तणाव प्रभावित करतो. डॉक्टरांच्या मते, ज्या गोष्टींमुळे तणाव निर्माण होतो, त्यापासून दूरच राहावे. रात्री पुरेशी झोप घ्यावी आणि रिलॅक्स होण्यासाठी ध्यानसाधना करावी. हिरव्या पालेभाज्या आणि सर्व प्रकारच्या आंबट फळांचे नियमित सेवन करावे. सुका मेवा, सर्व प्रकारच्या धान्यांपासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश करावा. नियमित व्यायाम करा. आठवड्यातून एकदा किमान मैलभर चालावे.
- दुर्लक्ष न करता उपचार करा
महिलांनी शरिरात होणाऱ्या बदलाकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते औषध उपचार घेतले पाहिजेत. परंतु महिला तसे न करता दुर्लक्ष करतात. याचा परिणाम त्याच्या जीवनशैलीवर होऊन त्यांना अनेक त्रासाचा सामना करावा लागतो. दरवर्षी आरोग्य तपासणी करा, म्हणजे तुमच्या शरीरातील बदलामुळे होणाऱ्या त्रासावर त्याचवेळी उपचार करता येतील.
-डॉ. सूर्यकुमार खंदारे, गायनोलॉजिस्ट आर्यविधी हॉस्पिटल








