राजापूर :
शहरातील पुनर्वसन परिसरात पुन्हा एकदा कचऱ्यांचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधीने नजीकच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोदवली ग्रामपंचायतीने याकरीता घंटागाडी खरेदी केली होती. मात्र डंपिंगसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने पुन्हा एकदा पुनर्वसन परिसरात डंपिंग ग्राऊंड बनले आहे.
कोदवली पुनर्वसन विभाग हा राजापूर शहरातील नागरिकांसाठी उभारण्यात आला. मात्र ते सध्या शहरानजीकच्या कोदवली ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे पूर्ण ताबा कोदवली ग्रामपंचायतीचा आहे. यापूर्वी याबाबत वृत्त प्रसिध्द होताच कोदवली ग्रामपंचायतीने याची दखल घेत पुनर्वसन वसाहतीमधील कचरा उचलण्यासाठी घंटागाडीचे नियोजन करुन प्रत्यक्षात कचरा उचलण्यास सुरुवात देखील केली होती. तर काही दिवस येथील कचरा नियमित उचलला जात होता. मात्र कोदवली ग्रामपंचायतीकडून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत घंटा गाडी बंद केली आहे. त्यामुळे कोदवली येथील पुनर्वसन वसाहत पुन्हा कचरा डंपिंग ग्राउंड झाले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुनर्वसन येथे तहसील निवास, गॅस एजन्सी व हॉटेल वॉटर येथील वळणाच्या पुढे कचऱ्याचे ढिग दिसून येतात.
सर्वाधिक महसूल देणारी ग्रामपंचायत पुनर्वसन वसाहतीमधील कचऱ्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात महसूल गोळा करणाऱ्या ग्रामपंचायतीला कचरा डंपिंगसाठी जागा मिळू नये ही लाजिरवाणी बाब असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
शहरात १९९३ साली पूररेषा अस्तित्वात आली. शहरातील पूरग्रस्त येऊन नागरिकांसाठी शासनाने शहराजवळच कोदवली ग्रामपंचायत हद्दीत पुनर्वसन वसाहत निर्माण केली आहे. सध्या या भागात साधारण ३५० भूखंडांवर पूरग्रस्तांनी बांधकाम केले आहे.
शहरातील पूरग्रस्त नागरिकांसाठी ही वसाहत उभी करताना हा भाग राजापूर नगर परिषद हद्दीत जोडणे आवश्यक होते.. मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष करत हा पुनर्वसन वसाहतीचा भाग तसाच कोदवली ग्रामपंचायत हद्दीत समाविष्ट केला आहे. या आधी नगर परिषदेनेही हद्दवाढीसाठी प्रयत्न चालू केले होते. यावेळी ग्रामपंचायतीने समाविष्ट होण्यास नकार दिला. त्यामुळे सोयी सुविधा देणे ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे.








