पुणे / प्रतिनिधी :
राज्यभर पावसाने धुमाकूळ घातला असून, जुलै महिन्याची सरासरीही या पावसाने ओलांडली आहे. 1 जुलै ते 23 जुलैच्या कालावधीतच सरासरीच्या 50 टक्के अधिक पावसाची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. दरम्यान, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भावर पावसाचा जोर असून, पुढील चार दिवस काही जिल्हय़ांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तसेच अरबी समुद्राकडून येत असलेल्या बाष्पामुळे राज्यात गेल्या आठवडय़ापासून दमदार पाऊस होत आहे. त्यातही कोकण गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रावर पावसाचा जोर आहे. ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्यात अतिवृष्टीची नोंद झाली. गेले आठवडाभर पाऊस सुरूच असून, पुढील चार ते पाच दिवस पावसाचा मारा सुरुच राहणार आहे.
सध्या मध्य प्रदेश व लगतचा भाग, कच्छ व लगतचा भागावर हवेची द्रोणीय स्थिती आहे. तसेच उत्तर आंध्र प्रदेश व दक्षिण ओरिसाच्या भागावर हवेची द्रोणीय स्थिती असून, येत्या 24 तासांत त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होणार आहे. 26 जुलैपर्यंत याची तीव्रता आणखी वाढणार असून, हे क्षेत्र आंध्र प्रदेश ओरिसाकडे सरकेल. यामुळे पावसाची जोर वाढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील पुढील चार दिवस पाऊस चांगला राहणार आहे.
जुलैची सरासरी पार, 50 टक्के अधिक पाऊस
1 जुलै ते 23 जुलै च्या कालावधीत महाराष्ट्रात साधारणपणे 236.60 मिमी इतका पाऊस होतो. मात्र, सध्या 355.40 मिमी इतका पाऊस आतापर्यंत नोंदविण्यात आला आहे. हा पाऊस सरासरीच्या 50 टक्के अधिकचा आहे.
सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टी, तर कोल्हापूर, रत्नागिरीत अतिरिक्त पाऊस
यात मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव जिल्हय़ात अतिवृष्टी, तर पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, जालना, औरंगाबाद, नाशिक, धुळे, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, अमरावती जिल्हय़ांत अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे.
पुणे, सातारा, सांगली समाधानकारक
पुणे, नगर, सातारा तसेच सांगलीत जुलै महिन्याची स्थिती समाधानकारक आहे. यात पुण्यात सरासरीच्या 16 टक्के अधिक, नगर उणे 6, सातारा उणे 13, सांगली उणे 12 टक्के पाऊस झाला आहे, तर नंदुरबारमध्ये सरासरीच्या 19 टक्के अधिक, नागपूर 18 टक्के अधिक, गोंदिया 3 टक्के अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे.
गोव्यात अतिवृष्टी, कर्नाटकात अतिरिक्त पाऊस
गोव्याला पावसाने झोडपले असून, येथे अतिवृष्टीची नेंद होत सरासरीच्या 85 टक्के अधिक पाऊस झाला आहे. तर कर्नाटकात अतिरिक्त पाऊस झाला असून, सरासरीच्या 38 टक्के अधिकचा पाऊस झाला आहे.
देशभरात सरासरी पार
दरम्यान, 1 जून ते 23 जुलैच्या कालावधीत देशभरात सरासरीच्या 4 टक्के अधिक पाऊस झाला आहे.
चार दिवस पाऊस
दरम्यान, बंगालच्या उपसागरात येत्या 24 तासांत कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार आहे. याच्या प्रभावामुळेही राज्यात जोरदार पाऊस होणार आहे. यात मंगळवार ऑरेंज अलर्ट
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, सातारा
बुधवार ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, सातारा, ठाणे, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर
गुरुवार ऑरेंज अलर्ट
रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, गोंदिया, चंद्रपूर
शुक्रवार ऑरेंज अलर्ट
सातारा








