पुणे / प्रतिनिधी :
पुढील दोन दिवसांत राज्यातील पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, राज्यात शनिवारी पालघर तसेच पुणे जिल्हय़ात घाट क्षेत्रात अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला असून, कोकणातील इतर जिल्हय़ांत, विदर्भात काही भागांत ऑरेंज अलर्ट आहे.
राज्यात गेले काही दिवस जोरदार पाऊस होत आहे. दक्षिण ओरिसा व उत्तर आंध्रच्या भागावर, दक्षिण छत्तीसगड व लगतच्या भागावर हवेची द्रोणीय स्थिती आहे. यामुळे देशात गुजरात, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, तेलंगणा, विदर्भ तसेच छत्तीसगडच्या काही भागांत शुक्रवारी अतिवृष्टी झाली. याचा प्रभाव शनिवारीही जाणवणार असून, पुणे तसेच पालघरच्या काही भागांत हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याबरोबरच रविवारीही काही जिल्हय़ांत ऑरेंज अलर्ट असून, त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे आहेत.
पाणीसाठा 38 टक्क्यांवर
गेल्या चार दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे राज्याचा धरणसाठा 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी हाच साठा 64 टक्के इतका होता.








