चिपळूण :
गेले ८ दिवस कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारपासून विश्रांती घेतल्यानंतर बुधवारपासून अर्धवट राहिलेल्या कामांच्या ठिकाणी यंत्रसामुग्रीची धडधड पुन्हा सुरू झाली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत परशुराम घाटात गॅबियन वॉलसह लोखंडी जाळीची शिल्लक राहिलेली तर शहरातील नद्यांमधील काहीसा थांबलेला गाळ उपसाही बुधवारपासून पुन्हा सुरू झाला आहे. तर अंदाज घेत हळूहळू शेतीच्या कामांनाही शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे.
१९ जूनपासून मान्सूनपूर्वने जोरदारपणे हजेरी लावत नद्या, नाले तुडुंब झाल्यानंतर हंगामी पाऊसही २ दिवसांपासून सर्वत्र सक्रिय झाला. गेले आठवडाभर कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी सुरू असलेली विकासकामे जागच्या जागीच ठप्प झाली. परशुराम घाटात धोकादायक दरडीच्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून लोखंडी जाळी बसवली जात आहे. लोखंडी जाळी बसवण्याचे काम आता अंतिम टप्यात येऊन ते पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात असतानाच अचानकपणे पाऊस सुरू झाल्याने सारी यंत्रसामुग्री जागच्या जागी ठप्प झाली होती. तर दुसरीकडे शहरातील वाशिष्ठी व शिवनदीत पाटबंधारे विभागाकडून सुरू असलेला गाळ उपसाही थांबला होता. किरकोळ प्रमाणात काठावरील गाळ उचलण्याचे काम सुरू होते. मात्र पावसामुळे त्यातही व्यत्यय आला होता.
पाऊस थांबण्याची सारी यंत्रणा वाट पाहत असतानाच मंगळवारपासून पावसाने विश्रांती घेतली. बुधवारी ८ दिवसांनंतर सूर्यदर्शन झाल्यानंतर कडकडीत ऊन पडले. परिणामी थांबलेली विकासकामे पुन्हा सुरू झाली आहेत. परशुराम घाटात लोखंडी जाळी ठोकण्याचे, तर गॅबियन वॉल भरावाची कामे सुरू करण्यात आली आहेत. गाळ उपशात पेठमाप, गणेश विसर्जन घाट व शिवनदी गाळ उपसा पुन्हा सुरू झाला आहे. दरम्यान, पावसाने भरलेली शेततळी हळूहळू मोकळी होत आहेत. त्यामुळे आणखी २ दिवस अंदाज घेऊन रखडलेली पेरणी आटोपती घेण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी तयारी केली आहे








