श्रावण महिना अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकसह देशाच्या विविध भागांत सध्या पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. मे आणि जूनमध्ये दमदार बरसलेल्या पावसाने जुलै आणि अर्ध्या ऑगस्टमध्ये काहीसा ताण दिला. त्यानंतर पुन्हा पावसाचे जोरदार पुनरागमन झाले असून, मागच्या दोन दिवसांतील पावसाने विविध राज्यांमधील जनजीवन विस्कळित झाल्याचे पहायला मिळते. यंदा पावसाचे वेळापत्रक बिघडले असले, तरी आत्तापर्यंत महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नियोजित वेळेआधीच अनेक धरणे ओसंडून वाहू लागली. तर काही धरणांमध्ये लक्षणीय जलसाठा झाल्याचे दिसले. आता दुसऱ्या टप्प्यातही पावसाने ऊद्रावतार धारण केल्याने अनेक गावांना, जिल्ह्यांना पुराने वेढा दिल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा हा तसा दुष्काळी पट्टा. तथापि, मागच्या दोन ते तीन दिवसांत मराठवाड्यात विक्रमी पाऊस होत आहे. येथील नांदेडमध्ये तर अक्षरश: ढगफुटी झाली असून, तब्बल 206 मिमी पावसाची नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, परभणी यांसह जवळपास सर्वच जिल्ह्यात दणकून पाऊस झाला आहे. विदर्भालाही पावसाने तडाखा दिल्याने पैनगंगेसह येथील सर्व नद्याही दुथडी भरून वाहताना दिसतात. तर मध्य प्रदेश, सातपुडा व खान्देशातही जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने तापी, पूर्णा या महत्त्वाच्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे धरण म्हणून जळगावातील हतनूर धरणाचा उल्लेख केला जातो. येथून तब्बल पावणे दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यातून या पट्ट्यातील पावसाची कल्पना करता येईल. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हा पावसा पाण्याचा प्रदेश. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरसह एकूणच पश्चिम घाट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गलाही पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. त्यामुळे अगदी कोयना, कृष्णा, पंचगंगेपासून काळ, सावित्री, जगबुडी, गड, वाशिष्ठी अशा सगळ्याच नद्या धोकादायक पातळीवरून वाहत आहेत. राज्यातील महत्त्वाचे धरण असलेल्या कोयनेसह अनेक धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. मागच्या काही वर्षांत कमी कालावधीत अधिकचा पाऊस अर्थात ढगफुटीच्या पावसाचा आपल्याला वारंवार अनुभव येत आहे. नांदेडमध्ये झालेला पाऊस याच प्रकारातील ठरावा. तेथे लेंडी नदीला आलेला पूर अभूतपूर्वच. याआधीही लेंडीला पूर आल्याची उदाहरणे आहेत. परंतु, या खेपेला झालेली हानी मोठीच म्हणावी लागेल. ढगफुटीने अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने कितीतरी जणांवर बेघर व्हायची वेळ आली. तर पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या 200 हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. तर काही जणांना आपला जीव गमवावा लागल्याचीही उदाहरणे आहेत. एकूणच महाराष्ट्रातील या प्रलयंकारी पावसात प्राणहानी, वित्तहानीसह शेतीचेही मोठे नुकसान झाले. सोयाबीन, कपाशी, काढणीला आलेला मूग, उडीद, केळी आदी पिकांचेही मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. राज्य सरकारकडून तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, या अतिवृष्टीने साधारणपणे 4 ते 5 लाख हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा अंदाज आहे. याशिवाय पशुधनाला मोठा फटका बसल्याचे दिसते. शेती आणि शेतीपूरक व्यवसायातून शेतकरी आपला उदरनिर्वाह करत असतो. या वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. प्रत्यक्षात अतिवृष्टी, पावसाचा बदललेला कालावधी यामुळे शेतीकरिता यंदाचा पाऊस फारसा फायदेशीर ठरलेला नाही. त्यामुळे आज तरी शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू दिसतात. पावसाचा ओघ असाच राहिला, तर नुकसानीचा आकडा आणखी वाढू शकतो. महाराष्ट्राच्या अर्थकारणात पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व इतर शहरांचा महत्त्वाचा मोठा वाटा आहे. परंतु, पावसाच्या पाण्यात येथील नियोजनव्यवस्था कोलमडली आहे. मुंबईची तुंबई झाल्याने हे शहर ठप्प झाले आहे. पुण्याचीही वेगळी स्थिती नाही. जलमय झालेले रस्ते, वाहतूक कोंडी यामुळे पुण्याचीही मुंबई झालेली दिसते. जे चित्र महाराष्ट्राचे, तेच इतर राज्यांचे. कर्नाटक, गोव्यापासून पंजाब, ओरिसा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशातही दमदार पाऊस होत आहे. हिमाचलमध्ये तर भूस्खलनाच्या घटनांचे सत्र सुरूच असून, 400 हून अधिक रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरसह अनेक शहरांना पुराच्या पाण्याचा विळखा पडला आहे. पंजाबमध्ये सतलज, बियास नद्यांना पूर आल्याने अनेक शहर व गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय उत्तराखंडमध्ये पावसाच्या ऊद्रावतारामुळे राज्यातील जनजीवन व पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. रेल्वे, विमान आणि बस या तिन्ही सेवा प्रवाशांसाठी महत्त्वाच्या असतात. परंतु, या तिन्ही सेवा कमी अधिक प्रमाणात ठप्प झाल्याने राज्यातील व परराज्यातील प्रवासी मोठ्या प्रमाणात खोळंबले आहेत. त्याचबरोबर दळणवळणालाही चांगलाच ब्रेक बसला आहे. पावसाने झोडपले, तर तक्रार कुणाकडे करायची, अशा अर्थाची आपल्याकडे म्हण आहे. ते खरे असले, तरी ढगफुटी वा पुराची तीव्रता वाढण्यास प्रामुख्याने मानवी आक्रमण कारणीभूत आहे, हे विसरता येणार नाही. रस्त्याची कामे, वेगवेगळे प्रकल्प, प्रवाहांची वळवावळवी, डोंगरफोड यामुळे ग्रामीण भागातील नैसर्गिक भूरचनेमध्ये बाधा निर्माण होत आहे. त्यातून अनेक भागांत पुराची तीव्रता वाढत असल्याचे निसर्गअभ्यासक व पर्यावरणतज्ञांचे म्हणणे आहे. ही वस्तुस्थितीच होय. ढगफुटीचा ट्रेंड हे तर ग्लोबल वॉर्मिंगचेच अपत्य म्हणता येईल. जागोजागी अचानकपणे होणाऱ्या या ढगफुटीसदृश पावसाने मागच्या काही वर्षांत सर्वांच्याच नाकात दम आणला आहे. निसर्गावरील आक्रमणाचे सत्र असेच सुरू राहिले, तर ढगफुटीचा हा धोका भविष्यकाळात आणखी वाढण्याची भीती आहे. परंतु, त्यातून कुणीच काही बोध घेण्यास तयार नाही. म्हणूनच भविष्यातील राज्य किंवा शहर कसे असावे, याचे सूत्रबद्ध नियोजन सरकारने आता तरी करायला हवे. अन्यथा, शहरे, गावे अशीच बुडत राहतील.
Previous Articleब्रिटनमध्ये शीख वृद्धांवर 3 युवकांकडून वर्णद्वेषी हल्ला
Next Article मार्कंडेय नदीला यावर्षी चौथ्यांदा पूर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








