एकूण पाऊस 75 इंचांहून जास्त, खोतीगावच्या पुलाच्या कठड्याचा भाग कोसळला
काणकोण : काणकोण तालुक्यात सतत चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम असून 21 रोजी एकाच दिवसात 101.6 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. आतापर्यंत या तालुक्यात 75 इंचांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. 2009 साली काणकोणात आलेल्या महापुरामुळे तळपण नदीकाठच्या कित्येक घरांमध्ये पुराचे पाणी शिरून घरे उद्धवस्त होतानाच काही जण बेघर झाले होते. तळपण नदीतील पाण्याची पातळी 21 रोजी 6 मीटर इतकी वाढली होती. संबंधित खात्याचे कर्मचारी तासातासाने पाण्याची पातळी तपासत असून सध्या तरी कसलाच धोका नसल्याची माहिती या कर्मचाऱ्यांनी दिली.
बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतानाच खोतीगाव पंचायतीमधील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पुलाच्या कठड्याचा एक भाग कोसळला आहे. या मार्गावरून दिवसभरात शेकडो दुचाकीस्वारांची त्याचप्रमाणे प्रवासी वाहनांची सतत रहदारी चालू असते. कठड्याचा भाग कोसळल्याने या ठिकाणी धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. किनारी भागांतील लोकांना सतर्कतेचा इशारा दिल्यामुळे मागच्या दोन दिवसांत काणकोण तालुक्यातील मच्छीमारांनी आपल्या होड्यांना विराम दिला आहे. त्यामुळे येथील मासळी खवय्यांची बरीच गैरसोय झाली आहे. बामणबुडो आणि कुस्के धबधब्यांवर कडक पोलीस पहारा ठेवण्यात आल्यामुळे मागच्या दोन दिवसांत या ठिकाणी कसलाच अनुचित प्रकार घडलेला नाही, अशी माहिती काणकोणच्या पोलीस स्थानकावरून देण्यात आली. सतत पडत असलेल्या पावसामुळे देखील एरव्ही या ठिकाणी जेवढी देशी पर्यटकांची गर्दी दिसायची तेवढी दिसलेली नाही, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली.









