वाहने थेट नदीपात्रात कोसळण्याची शक्यता
ओटवणे | प्रतिनिधी
सातुळी – माडखोल मार्गादरम्यान दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पुलावरील रेलिंग अज्ञात वाहनाच्या धडकेत तुटून नदीपात्रात कोसळले. या पुलाच्या तोंडावरच काटकोनी आकाराच्या वळणावरील हे रेलिंग तुटल्यामुळे वाहने थेट नदीपत्रात कोसळून या ठिकाणी अपघाताची दाट शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने याची तात्काळ दखल घेऊन त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी या भागातून होत आहे.अनेक वर्षांच्या मागणीनंतर दोन वर्षांपूर्वी नदीवर हा पूल बांधण्यात आला. या पुलामुळे सातुळी, बावळाट या दोन्ही गावांसह केसरी व सरमळे गावच्या काही भागाला सावंतवाडी येथे तर माडखोल गावासह कारिवडे गावच्या काही भाग भागाला बांदा बाजारपेठे परिसरात जायचे असल्यास सावंतवाडी – आंबोली या राज्यमार्गावरील सातुळी तिठा येथे जाण्याची गरज नाही. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा पूल असून सातुळी, बावळाट या दोन्ही गावांसह केसरी व सरमळे गावचा काही भाग थेट सावंतवाडीला जोडला गेला आहे. तसेच माडखोल गावासह कारिवडे गावचा काही भाग थेट बांदा बाजारपेठेशी जोडला आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमी गर्दी असते.सध्या या पुलावरील रेलिंग अज्ञात वाहनाच्या धडकेत नदीपात्रात कोसळले आहे. त्यामुळे पुलाच्या तोंडावरील अगोदरच धोकादायक बनलेले वळण आणखी धोकादायक बनले आहे. या पुलाच्या जोड रस्त्याला रेलिंग नसल्यामुळे वाहने थेट नदीपात्रात कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धोकादायक वळणावरील तुटलेले रेलिंग संबंधित खात्याने तात्काळ पूर्ववत बसवून संभाव्य अपघात टाळावे अशी मागणी बावळाट गावचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश कदम यांनी केली आहे.









