तरुणाईत सळसळता उत्साह : बालचमूंचा अमाप प्रतिसाद : गावागावांमध्ये भगवेमय वातावरण : दौडीचे ठिकठिकाणी स्वागत
वार्ताहर /किणये
तालुक्यातील विविध गावांमध्ये दुर्गामाता दौड अमाप उत्साहात सुरू आहे. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित दौडमुळे गावागावातील युवकांमध्ये एकात्मतेचे दर्शन दिसून येत आहे. पहाटे निघणाऱ्या दौडमुळे सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. भगवे ध्वज, भगव्या पताका लावण्यात आल्यामुळे अवघा तालुका भगवेमय दिसू लागला आहे. शुक्रवारी खादरवाडी, यळेबैल, देसूर गावात काढण्यात आलेली दुर्गामाता दौड लक्षणीय ठरली आहे. रविवारपासून दुर्गामाता दौडला सुरुवात झाली असून सध्या या दौडमध्ये सहभागी होणाऱ्या धारकऱ्यांची संख्या वाढली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तालुक्याच्या बहुतांशी गावांमध्ये दुर्गामाता दौडचे प्रस्थ वाढलेले दिसून येत आहे. दौडचे वेळापत्रक ठरविण्यात आले असून ज्या मार्गावरून दौड निघणार आहे, त्या मार्गावर रांगोळ्या काढण्यात येत आहेत. ठिकठिकाणी दौडच्या स्वागताचे फलक लावण्यात आलेले आहेत. शिस्तबद्ध पद्धतीने दुर्गामाता दौड सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
यळेबैलमध्ये धारकऱ्यांचा मोठा सहभाग
यळेबैल गावात शुक्रवारी दुर्गामाता दौड काढण्यात आली. या दौडमध्ये पंचक्रोशीतील धारकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. गावच्या वेशीतून दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली. मल्लाप्पा शहापूरकर, रमेश मरगाळे, लक्ष्मण शहापूरकर, मोहन शहापूरकर आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व ध्वज पूजन करण्यात आले. या दौडमध्ये बालचमू व तरुणांनी भगवे फेटे परिधान केले होते. यामुळे यळेबैल गावात भगवेमय वातावरण दिसून आले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा धारकरी देत होते. पुष्पवृष्टी करून व आरती ओवाळून या दौडचे स्वागत करण्यात येत होते. यळेबैल गावातील पाटील गल्लीतील नागरिकांच्यावतीने दौडमधील धारकऱ्यांसह चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी परशराम पाटील व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. या दौडमध्ये कावळेवाडी, राकसकोप, बिजगर्णी, बेळवट्टी भागातील धारकरी सहभागी झाले होते.
खादरवाडीत दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद
खादरवाडी गावातील सहाव्या दिवशी दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन परशराम गोरल यांनी केले. ध्वज पूजन आनंद बस्तवाड यांनी केले. त्यानंतर गणपत गल्ली येथेही दुर्गामाता दौड झाली. या दौडमध्ये गावातील बालचमूनी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या वेषभूषा परिधान केल्या होत्या. तसेच काही तरुणांनी मावळ्याच्या वेषभूषाही परिधान केल्या होत्या. धारकरी, ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र म्हणत होते. याप्रसंगी प्रमुखांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
देसूर गावात लक्षवेधी दुर्गामाता दौड
देसूर गावातील दुर्गामाता दौडमध्ये गावातील नागरिकांचा सहभाग वाढलेला आहे. शुक्रवारी सूर्योदयप्रसंगी निघालेली दौड साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. लक्ष्मी मंदिर येथून या दुर्गामाता दौडला प्रारंभ झाला. ध्वज व शस्त्र पूजन विलास रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत देसूर विभाग प्रमुख नागराज सावंत व पांडुरंग ठोंबरे यांनी केले. संपूर्ण गावभर ही दौड निघाली. गावात दौडचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येत होते. दौडीत पंकज घाडी, मयूर गुरव, रामा जाधव, सतीश काळसेकर आदींसह धारकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.









