मार्कंडेय प्रदूषित : निर्माल्य कुंडांची गरज, पर्यावरण प्रेमींतून नाराजी
बेळगाव : उत्साहात आगमन झालेल्या दीड आणि पाच दिवसांच्या गणरायांना निरोप दिला आहे. मात्र गणरायांबरोबर असलेले निर्माल्य नदी, तलाव आणि विहिरीत विसर्जित केले जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील निर्माल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषत: आंबेवाडी येथील मार्कंडेय नदी काठावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य टाकले आहे. त्यामुळे जलप्रदुषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. साहजिकच पर्यावरण प्रेमींतून नाराजी व्यक्त होवू लागली आहे. शिवाय या ठिकाणी निर्माल्या कुंडाची उभारणी करावी, अशी मागणीही होत आहे. गणेशोत्सव काळातील निर्माल्य जवळच्या नदी, तलाव आणि सार्वजनिक विहिरींत विसर्जित केले जात आहे. त्यामुळे जलप्रदुषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गणेशोत्सव काळात विविध ठिकाणी सत्यनारायण पूजा, गणहोम आणि इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यामुळे निर्माल्याच्या प्रमाणाहीत वाढ झाली आहे.
निर्माल्य विसर्जनाचा प्रश्न गंभीर
शहरात मनपाने विसर्जनासाठी फिरते जलकुंड तयार करून व्यवस्था केली आहे. मात्र ग्रामीण भागात गणराय आणि निर्माल्य विसर्जनासाठी कोणतीच व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निर्माल्य विसर्जनाचा प्रश्न उद्भवू लागला आहे. विशेषत: मार्कंडेय नदी काठावर, उचगाव, आंबेवाडी, मण्णूर, कंग्राळी खुर्द, कडोली, अलतगा, काकती, होनगा आदी ठिकाणी निर्माल्य कुंड उभारण्याची गरज आहे. मार्कंडेय नदी शेजारी असलेल्या गावातून मूर्ती आणि निर्माल्य मार्कंडेय नदीतच विसर्जित केले जाते. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होवू लागला आहे. आता संबंधित ग्राम पंचायती लक्ष देणार का? असा प्रश्नही पडू लागला आहे.
पीडीओंना निर्माल्य कुंड उभारण्याची सूचना करावी
यंदाच्या हंगामात रोजगार हमी योजनेतून नदीची स्वच्छता करून खोली वाढविण्यात आली आहे. मात्र गणेशोत्सव काळात याच नदीत आता अस्वच्छता निर्माण होवू लागली आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेतून केलेली कामे वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. तेव्हा तालुका पंचायतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे व संबंधित ग्राम पंचायतींच्या पीडीओंना निर्माल्य कुंड उभारण्याची सूचना करावी, अशी मागणी होत आहे.