अपघातांच्या संख्येत वाढ
बेळगाव : शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत काँक्रिटचे रस्ते करण्यात आले आहेत. परंतु काँक्रिटचा रस्ता व त्या शेजारील पेव्हर्स यामध्ये चर भरण्यात आली नसल्याने वाहने अडकत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी अपघातही झाले आहेत. विशेषत: तिसरे रेल्वेगेट येथे ही चर धोकादायक ठरत असून एखाद्या निष्पापाचा बळी जाण्यापूर्वी या चरीमध्ये काँक्रिट भरण्याची मागणी करण्यात येत आहे. काँक्रिटचा रस्ता व पेव्हर्स यामध्ये बऱ्याच ठिकाणी अर्ध्या फुटाची चर आहे. काँग्रेस रोडमार्गे डी मार्टकडे जाणारी वाहने या चरीमध्ये अडकत आहेत. दुचाकी वाहनांची चाके चरीमध्ये अडकत असल्याने रात्रीच्यावेळी अपघात होत आहेत. बऱ्याचवेळा वाहने घसरून अपघात झाल्याने वाहनचालक जखमी झाले आहेत.









