कोल्हापूर / सुधाकर काशीद :
लाच थेट मागितली तर ते कोणीतरी रेकॉर्ड करणार. किंवा फोनवर मागितली, त्यासंबंधी चर्चा केली तर तेही रेकॉर्ड होणार, या भीतीने लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खास माणसेच नेमली आहेत. ‘चहापेक्षा किटली गरम’ अशा गुणाची ती माणसे आहेत. लाचखोरांच्या भाषेत ‘पंटर’ अशी त्यांची ओळख आहे आणि ते पण तडजोडीची मोठी भूमिका बजावत आहेत. अनेक प्रकरणांत लाच घेताना पहिल्यांदा पंटर सापडले आहेत. पण पंटर सापडला म्हणून आपण ‘आपले हात वर करायची संधी’ लाचखोरांना मिळणे बंद झाले आहे.
कोल्हापुरातील काही ठराविक कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी असे पंटर नेमले आहेत. ते गुपचूप आपले काम करतात, अशी परिस्थिती अजिबात नाही. ‘कोणाचा कोण पंटर’ हे साऱ्या जिह्याला माहिती आहे आणि त्यांचा विविध कार्यालयातील वावरही अगदी मुक्त आहे. हे पंटर आले तर लगेच त्याला सोडायचे, हे दरवाजावरच्या शिपायांनाही कळून चुकले आहे. लाचखोरांनी तर शासकीय यंत्रणेला बदनाम केलेच आहे. पण या पंटरांनी तर त्यात आणखी भर टाकली आहे. बाहेरचे तेच ते ठराविक लोक ठराविक अधिकाऱ्यांजवळ का घुटमळतात, याकडे बारकाईने पाहिले तर खूप बारकावे नजरेस येणारे आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली एखाद्यावर कारवाई करायची असेल तर तत्पूर्वी लाच घेणाऱ्याशी झालेले संभाषण, त्याची टेप, त्याचे अन्य मार्गाने केलेले संभाषणाचे रेकॉर्डेड पुरावे आवश्यकच असतात. लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्याला लाच द्यावी, अशा अर्थाने त्यांचे झालेले संभाषण पडताळून पाहूनच पुढच्या कारवाईला वरिष्ठांकडून मान्यता मिळते. पण कारवाईची ही पद्धत लाचखोरांना माहीत झाली आहे. त्यामुळे ते जवळच्या कोणत्याही माणसाचा फोन असू दे, लाच आणि काम या विषयावर ते फोनवर एक शब्दही बोलत नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावा मिळत नाही. पण म्हणून त्यांची लाच घेण्याची हाव सुटत नाही. त्यामुळे त्यांनी ‘किती देणार आणि काय काम’ असल्या चर्चेसाठी पंटर लोक नेमले आहेत.
हेच पंटर लोक संबंधित गरजू व्यक्तीशी चर्चा करतात. व्यवहार ठरवतात. लाच घेणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्याला कोणताही त्रास होऊ नये, याची खबरदारी स्वत: घेतात व व्यवहार पूर्ण करून देतात. त्या बदल्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जे काही आहे ते तर घेतातच आणि त्यातून आपलाही वाटा बाजूला काढतात. कोल्हापुरात असे चतुर पंटर विशेषत: जागा व्यवहार, परवानग्या, दंडमाफी, परवाने, नूतनीकरण बिगरशेती, प्लॉटिंग आराखडे, मंजुरी, पोलीस कारवाई अशा व्यवहारात आहेत. अधिकाऱ्याला ज्या वाटा माहीत नाहीत, त्या वाटा त्यांना माहिती असतात. किंबहुना अधिकरी, कर्मचाऱ्यांची ‘अंदर की बात’ त्यांना माहीत असते. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी त्यांना दबकून असतात आणि त्याचाच फायदा हे पंटर घेतात.
पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्यावर लोकसेवक म्हणून गंभीर गुन्हा दाखल होतो. या पंटर मंडळीवर सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल होतो. त्यांना कायद्याची भीती नाही. पण वरकमाईची मोठी हाव आहे. आणि भ्रष्टाचाराच्या घटनांत असा पंटर मंडळींचाही मोठा सहभाग खूप धोकादायक आहे. विशेष हे की, कोणत्या अधिकाऱ्याचा, कर्मचाऱ्यांचा कोण पंटर, हे जगजाहीर आहे. पण तरी त्याचा दबदबा, त्यांचा रुबाब शासकीय, निमशासकीय कार्यालयात अजूनही कायम आहे.
आजपर्यंत 70 पंटर जाळ्यात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना हे माहीत नाही, असे नाही. त्यामुळे पण चर्चा, संभाषणावरही त्यांचे लक्ष असते. पण त्यांच्या संभाषणात जरी अमुक साहेबाला इतके द्यावे लागणार, असा संदर्भ आला तरी त्यावर ते काटेकोर लक्ष ठेवतात व पूर्ण पडताळणी करून कारवाई करतात. जिह्यात आजवर असे 60, 70 पंटर कारवाईत सापडले आहेत.








