वृत्तसंस्था/ कोईमतूर
पंजाबच्या 16 वर्षांखालील क्रिकेट संघाने विजय मर्चंट चषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. या स्पर्धेतील झालेल्या अंतिम सामन्यात पंजाबने मध्यप्रदेशचा 10 गडय़ांनी दणदणीत पराभव केला.
या सामन्यात पंजाब संघातील 14 वषीय फिरकी गोलंदाज अनमोलजित सिंगने 11 गडी बाद केले. अनमोलजित सिंग हा भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजनसिंग प्रमाणे फिरकी गोलंदाजी करत असून तो ‘दुसरा’ चेंडू टाकण्यात तरबेज आहे. या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मध्यप्रदेशचा पहिला डाव 162 धावात आटोपला. अनमोलजित सिंगने 64 धावात 6 गडी बाद केले. पंजाबने पहिल्या डावात 238 धावा जमविल्या. त्यानंतर मध्यप्रदेशचा दुसरा डाव 172 धावात आटोपला. पंजाबच्या अनमोलजित सिंगने 93 धावात 5 गडी बाद केले. पंजाबला या सामन्यात विजयासाठी 97 धावांची जरुरी होती. पंजाबने 23.2 षटकात बिनबाद 97 धावा जमवित सामना आणि स्पर्धेचे जेतेपद मिळविले. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनमोलजित सिंगने एकूण 65 गडी बाद केले असून त्याने नऊवेळा एका डावात 5 बळी मिळविले आहेत.









