मुख्यमंत्री मान यांची घोषणा : अमरिंदर सिंह अन् रंधावांकडून वसूल करणार
वृत्तसंस्था/ चंदीगड
गँगस्टर मुख्तार अंसारीशी निगडित लाखो रुपयांचा कायदेशीर खर्चाची रक्कम भरण्यास नकार दिल्यावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आता ही रक्कम माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि माजी तुरुंग मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांच्याकडून वसूल करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री कायांल्याने सुमारे 55 लाख रुपयांचे देयक अदा करण्याची फाइल परत पाठविली होती.
उत्तरप्रदेशातील गँगस्टर अंसारीला पंजाबच्या तुरुंगात ठेवण्याचा आणि सर्वोच्च न्यायालयात त्याचा खटला लढण्याचे 55 लाख रुपयांचे शुल्क पंजाबच्या तिजोरीतून भरले जाणार नाही. ही रक्कम तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिं आणि तुरुंग मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांच्याकडून वसूल करण्यात येईल. त्यांनी ही रक्कम न भरल्यास त्यांची पेन्शन अन् इतर शासकीय लाभ रद्द करण्यात येतील असे मुख्यमंत्री मान यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने एप्रिल महिन्यात सर्वोच्च न्यायालयातील एका वरिष्ठ वकिलाचे बिल परत पाठविले होते. या वकिलाने पंजाबच्या रोपड तुरुंगात कैद मुख्तार अंसारीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात खटला लढविला होता. याप्रकरणी प्रत्येक सुनावणीसाठी वकिलाला सुमारे 11 लाख रुपये देण्याचा निर्णय काँग्रेस सरकारच्या काळात झाला होता.
मुख्तार अंसारी हा सुमारे अडीच वर्षे (2019-21) पंजाबातील रोपड तुरुंगात कैद होता. पोलिसांनी त्याला ट्रान्झिट रिमांडवर उत्तरप्रदेशातून आणले होते. मोहाली पोलिसांनी एका बिल्डरच्या तक्रारीवर मुख्तार विरोधात गुन्हा नोंदविला होता. पंजाब सरकारने अंसारीला स्वाधीन करावे अशी मागणी उत्तरप्रदेश पोलिसांनी केली होती. परंतु पंजाब सरकारने याला वारंवार नकार दिला होता. उत्तरप्रदेश सरकारने 25 वेळा पंजाब सरकारला पत्र लिहून मुख्तार अंसारील सुपूर्द करण्याची मागणी केली होती. तर पंजाब सरकारने अंसारी आजारी असल्याचे कारण दिले होते. या विरोधात उत्तरप्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी पंजाब सरकारने एक वरिष्ठ वकील नेमला होता, याकरता 55 लाख रुपयांर्चा खर्च आला आहे.









