अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा हरिनामाची कीर्ति, ईश्वराची भक्ती आणि संतसंगती ही त्रिवेणी ज्याला लाभते त्याला अडचणी बाधत नाहीत. त्यातही गंमत अशी आहे की, जो माझी भक्ती करण्याच्या उद्देशाने अखंड नामस्मरण करतो त्याच्या मनात सत्संगती करावी अशी इच्छा आपोआपच निर्माण होते.
माझ्या सांगण्याबद्दल साशंक असलेले लोक विचारतील की, संतसंगतीप्रमाणे योग, याग, आसन, ध्यान, तप, मंत्र, औषधी ही इतर साधने आहेतच की, मग संतसंगतीचे एव्हढे महत्त्व का? तर ह्याचं कारण असं की, अध्यात्मामध्ये देहाभिमान नाहीसा होण्याला फार फार महत्त्व आहे पण संतसंगती सोडून इतर साधने करत असताना मी, ही साधने माझ्या स्वत:च्या जीवावर करतोय असे स्वत:चे मोठेपण ठळक करणारे विचार साधकाच्या मनात सतत येत असतात पण संतसंगती साधली की, संतांच्या सान्निध्यात आलेल्या साधकाचे मी पणाचे विचार संत शोषून घेतात आणि त्याचे चित्त शुद्ध करतात.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हणतात ते ह्यासाठीच. साधकाच्या मनातले मी पणाचे विष संत शोषून घेतात. विशेष म्हणजे ते त्यांना बाधत नाही. दुसऱ्यांचे मी पणाचे विष शोषून घेताना, स्वत: त्यापासून बाधित न होण्याची कला संतांना साधलेली असते कारण त्यांचं चित्त पूर्णपणे शुद्ध झालेलं असतं. साधकाचा देहाभिमान नष्ट करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य संत करत असतात. योग व इतर साधनांच्यामुळे लहान विघ्ने नष्ट होतात पण ज्याला विघ्नांचा राजा असं म्हणतात तो देहाभिमान मात्र त्यांना दाद देत नाही. अत्यंत दुर्धर असलेला देहाभिमान अतिदारुण असल्याने देहदु:ख भोगायला लावतो.
अशा ह्या देहाभिमानाचे समूळ निर्दालन सत्संगाच्या माध्यमातून आपोआपच होते. अज्ञानामुळे मी शहाणा आहे, मला सर्व कळतं असा माणसाला अभिमान वाटत असतो. संतसंगतीमुळे तो तात्काळ नाहीसा होतो. म्हणून संतसंगतीसारखे अन्य साधन नाही. काही मूर्ख लोकांचं असं म्हणणं आहे की, योगसाधनेतून देह अजरामर होतो. मी त्यांना मूर्ख म्हणतो कारण जितके म्हणून देह आहेत ते सर्व प्रारब्धाच्या आधीन असतात मग प्रारब्धानुसार येणारे जन्ममरण देहाला कसे चुकेल? परंतु ही गोष्ट लक्षात न घेता ते देहाला योगसाधनेच्या माध्यमातून अजरामर करू पाहतात. प्रारब्धाच्या सर्व नाड्या काळाच्या हातात असतात. त्यानुसार देहाचे जन्ममरणही त्याच्याच हातात असते. कुणालाही कोणत्याही परिस्थितीत जन्ममरण चुकत नाही. जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित असतो. ज्या मार्कंडेयाने तपोबलाच्या सामर्थ्यावर चौदा कल्प आयुष्य जोडले त्या मार्कंडेयालासुद्धा काळाने सोडले नाही. सर्व सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाच्या हातून झालेली आहे. त्याला चार हजार युगे आयुष्य असले तरी कल्पांती त्याचाही अंत निश्चित आहे आणि ब्रह्मदेवाचं काय घेऊन बसलास, जो काळाचे नियमन करतो त्या विष्णूलासुद्धा काळ सोडत नाही. तसेच इतरांचा विनाश करणाऱ्या रुद्राची होळीही महाबली असलेला काळ स्वत: करतो. अशा ह्या अति दुर्धर असलेल्या काळावर अविवेकी नर विजय मिळवायचा प्रयत्न करतात. त्यातून त्या पामरांना काळजय साधून अजरामर व्हायचे असते.
खरं म्हणजे जे जे दिसतंय ते ते नष्ट होतं ही काळाची सत्ता सर्वजण जाणतात. तरीही हे अजरामर होण्याचे वेड ह्या मूर्खांना लागलेले असते आणि त्यासाठी त्यांचे आटोकाट प्रयत्न सुरु असतात. जिथे संसारच नश्वर आहे तिथे देह अजरामर कसा असेल? पण हे ह्या मूर्खांना सांगणार कोण? आणि त्यांना ते पटणार तरी कसे? ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांचे आपले अपार उपाय करून, देहाला यातना देऊन, अजरामर होण्याचे प्रयत्न सुरूच असतात. मग शहाणपणा कशात आहे असे विचारशील तर देह गेला तर खुशाल जाऊदेत पण जीवात्मा चिरंजीव कसा होईल हे पाहणे अगत्याचे आहे.
क्रमश:








