साहित्यिक डॉ. सिद्धण्णा लंगोटी यांचे प्रतिपादन : कुमार गंधर्व रंगमंदिर येथे व्यसनमुक्ती दिन
बेळगाव : व्यसनाच्या आहारी जाऊन कुटुंब, गाव, शहर, राज्य, देश आणि विदेशातील लोकसुद्धा आपल्या जीवनाचे नुकसान करून घेत आहेत. यासाठी व्यसनमुक्ती समाज निर्मितीच्या कार्यात लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे मत साहित्यिक डॉ. सिद्धण्णा लंगोटी यांनी व्यक्त केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कर्नाटक राज्य मद्यपान नियंत्रण मंडळ, माहिती व प्रसारण खाते, आरोग्य खाते, शिक्षण खाते, महानगरपालिका, कन्नड आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कुमार गंधर्व रंगमंदिर येथे दि. 1 रोजी व्यसनमुक्ती दिन आचरण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याच कार्यक्रमात डॉ. महांत शिवयोगीमठ यांची जयंतीही साजरी करण्यात आली.
तंबाखूचे सेवन आपले जीवन कमी करत आहे. तरुण पिढी अनेक व्यसनांच्या मागे लागली आहे. त्यांना व्यसनाचे दुष्परिणाम समजावून देणे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. व्यसनांमुळे मानसिक, सामाजिक व शारीरिक हानी होते, हे लक्षात घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी महांत शिवयोगी यांच्या तत्त्वांची माहिती दिली. माहिती व प्रसिद्धी खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर यांनी स्वागत केले. महांत शिवयोगी यांनी 80 च्या दशकामध्ये देश आणि विदेशामध्ये हितोपदेश करत जागृती केली, असे त्यांनी सांगितले. यावेळी कन्नड व सांस्कृतिक खात्याच्या विद्यावती बजंत्री, जिल्हा कुष्ठरोग नियंत्रणाधिकारी डॉ. चांदणी देवडी आदी उपस्थित होते. यावेळी सिद्धण्णा लंगोटी व त्यांच्या पत्नीला सन्मानित करण्यात आले. सुनीता देसाई यांनी सूत्रसंचालन केले. तत्पूर्वी आरटीओ सर्कल येथून जनजागृती फेरी काढण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी फेरीचे उद्घाटन केले.









