चिपळूण :
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणदरम्यान परशुराम घाटात उभारण्यात आलेल्या गॅबियन भिंतीचा काही भाग मातीच्या भरावासह सोमवारी मुसळधार पावसात पायथ्याशी असलेल्या पेढे गावात वाहून गेला. त्यामुळे कुंभारवाडी आणि पानकरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
गेल्या पावसाळ्यात घाटात उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंती कोसळल्यानंतर तेथील खचलेला भाग बुजवून त्यावर गॅबियन वॉल उभारण्याचे काम सुरू होते. सुमारे 20 मीटर उंचीच्या भिंतीसाठी गॅबियन बॅग्जमध्ये माती भरून उभारणी सुरू होती. मात्र पावसामुळे या भिंतीला मोठा फटका बसला असून भिंतीचा काही भाग कोसळून भरावाची माती वाहून पायथ्याला असलेल्या वस्तीपर्यंत पोहोचली आहे. परिणामी घरांच्या आजूबाजूला दलदल निर्माण झाली आहे. मे महिन्यात सुरू झालेल्या पावसापासून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारच्या या घटनेनंतर ग्रामस्थात संतापाची लाट पसरली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला अशी परिस्थिती निर्माण झाल्यास पुढे आणखी गंभीर संकट ओढवू शकते, अशी चिंता स्थानिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, मे महिन्यातच पावसामुळे परशुराम घाटातील माती गावाच्या शेतीत आली होती. ही समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परिणामी सोमवारी घरांमध्ये माती आणि चिखल शिरल्याने याला जबाबदार ठेकेदार व प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.








