प्रादेशिक आयुक्त कार्यालयातील माहिती : स्थायी समिती निवडणुका घेण्यात महापालिकेची आडकाठी?’
प्रतिनिधी / बेळगाव
महापौर-उपमहापौर निवडणूक दि. 6 रोजी पार पडली. मात्र अद्यापही स्थायी समिती निवडणुका घेण्यासाठी तारीख निश्चित झाली नाही. महापालिका प्रशासनाकडून याबाबतचा प्रस्ताव प्रादेशिक आयुक्त कार्यालयाला मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे स्थायी समिती निवडणुका घेण्यात महापालिका प्रशासनाची आडकाठी आहे का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
स्थायी समिती निवडणुका घेण्यासाठी प्रस्ताव तयार केला असून प्रादेशिक आयुक्तांना पाठविण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. पण महापौर-उपमहापौर निवडणुका होऊन पंधरा दिवस होत आले तरी महापालिकेकडून अद्याप स्थायी समिती निवडणुकीबाबत प्रादेशिक आयुक्तांना प्रस्ताव पाठविण्यात आला नाही. त्यामुळे प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडून निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.
प्रस्ताव देण्यासाठी तयारी
स्थायी समिती निवडणुका घेण्यासाठी सर्व माहितीचा प्रस्ताव प्रादेशिक आयुक्तांना पाठविणे आवश्यक आहे. त्यानंतर तारीख निश्चित केली जाते. पण प्रस्ताव नसल्याने निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात आली नाही. महापालिकेकडून प्रस्ताव देण्यासाठी तयारी करण्यात आली होती. सामान्य प्रशासन उपायुक्त तथा प्रभारी कौन्सिल सेव्रेटरी यांच्याकडे हा प्रस्ताव कौन्सिल विभागाने पाठविला होता. पण हा प्रस्ताव प्रादेशिक आयुक्त कार्यालयात गुऊवारपर्यंत पोहोचला नव्हता.
स्थायी समिती निवडणुका घेण्यास महापालिका प्रशासन उदासीन असल्याचे निदर्शनास आले आहे. स्थायी समिती निवडणुका घेण्यात मनपा प्रशासनाची आडकाठी आहे का? असा मुद्दाही उपस्थित झाला आहे. निवडणुकीसाठी प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडे मनपाचा प्रस्ताव कधी पाठविणार? अशी विचारणा होत आहे.









