जांबोटी-कणकुंबी-बैलूर भागातील मतदारांना संबोधीत करणार : समितीसह भाजप, काँग्रेस निजदच्या उमेदवारांचा होणार झंझावाती प्रचार
वार्ताहर /कणकुंबी
खानापूर मतदार संघातील उमेदवारांचे मंगळवारी जांबोटी येथे निवडणुकीसंदर्भात शक्तीप्रदर्शन होणार आहे. खानापूर तालुक्मयाच्या पश्चिम भागातील जनतेला व्यापाराच्या दृष्टीने सोयीसाठी असलेल्या जांबोटी येथे मंगळवार दि. 2 मे हा बाजाराचा दिवस असल्याने सर्वच पक्षाच्या प्रचारसभांनी आजचा दिवस धडाडणार आहे. जांबोटी येथे खानापूर मतदारसंघातील सर्व उमेदवार आपापल्या प्रचारसभा घेऊन जांबोटी-कणकुंबी आणि बैलूर भागातील मतदारांना संबोधीत करणार आहेत. पश्चिम भागातील जांबोटी हे मुख्य केंद्र असल्याने प्रत्येकवेळी निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि प्रचारसभांचे आयोजन करण्यासाठी येथील मंगळवार हा बाजाराचा दिवस निवडला जातो. यावेळी खानापूर तालुक्मयातून भाजपातर्फे विठ्ठल हलगेकर, काँग्रेसतर्फे अंजली निंबाळकर, म. ए. समितीतर्फे मुरलीधर पाटील व निजदतर्फे नासीर बागवान हे प्रामुख्याने प्रबळ उमेदवार समजले जातात.
भाजप- म. ए. समितीची प्रचारात आघाडी
य् ाावषीच्या निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्मयता असून सद्यस्थितीत जांबोटी, कणकुंबी, बैलूर भागात प्रचारांमध्ये आघाडी घेऊन आपली शक्ती दाखविण्यामध्ये भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र एकीकरण समितीने आघाडी घेतली आहे. जांबोटी येथे होणाऱ्या प्रचारसभांमध्ये मतदारांचे अधिक संख्याबळ कुणाकडे असणार हे पाहण्यासाठी नागरिकांची उत्सुकता असते. प्रत्येक वेळीच्या निवडणुकीत जांबोटी भागातील प्रचारामध्ये अधिक संख्याबळ मिळविणाऱ्या उमेदवाराचा विजय निश्चित होत असतो. वास्तविक जांबोटी हा भाग महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला समजला जात होता. परंतु एकदा भाजपाने तर एकदा काँग्रेस पक्षाने या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने एकजूट होऊन मुरलीधर पाटील यांना रिंगणात उभं केल्याने निवडणुकीला रंग आला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांचे आज जांबोटी भागात शक्तीप्रदर्शन होणार आहे.
निजद-काँग्रेसचाही घरोघरी प्रचार
वास्तविक जांबोटी, कणकुंबी भागात यापूर्वी म. ए. समिती बळकट होती. परंतु सद्यस्थितीत युवा वर्गाचा कल भाजपाकडे जात असल्याने भाजपाचे वर्चस्व दिसून येत आहे. एकंदरीत आज जांबोटी येथे होणाऱ्या प्रचाराच्या शक्तीप्रदर्शनात कोण बाजी मारणार आणि 13 तारखेला होणाऱ्या विजयाचे वाटेकरी कोण होणार, याची उत्सुकता मतदारांमध्ये शिगेला पोहोचली आहे. सध्या भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र एकीकरण समिती, निधर्मी जनता दल आणि काँग्रेस पक्षाने जांबोटी भागातील प्रत्येक गावात आपला प्रचारदौरा घराघरापर्यंत पोहचवला आहे. प्रत्येक गावातील मतदार उमेदवारांना आम्ही तुमच्याच पाठीशी आहोत, असं बेधडक सांगत असले तरी आज जांबोटीत होणाऱ्या जाहीर प्रचारसभेत गोची होणार आहे. कारण हल्ली नेत्यांप्रमाणे मतदारही स्थिर नसल्याने निवडणुकीच्या निकालाचा अंदाज व्यक्त करणे सोपे राहिले नाही. हल्लीच्या निवडणुकीत काही मतदार फिरण्यासाठी एक पक्ष, आर्थिक लाभ उठवण्यासाठी दुसरा पक्ष तर मतदान करताना तिसराच पक्ष निवडतात त्यामुळे खरे चित्र निवडणूक निकालानंतरच मिळणार यात शंका नाही.









