बिगरगोमंतकीयांना अधिक नोकऱ्या बहुतांश उच्च पदे बिगरगोमंतकीयांनाच
प्रतिनिधी/ पणजी
मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्व नोकऱ्या गोमंतकीयांना आणि प्रामुख्याने पेडणेकरांना देणार, हे सरकारचे आश्वासन शेवटी फोल ठरले असून अंदाजे 45 ते 50 टक्के नोकऱ्या बिगरगोमंतकीयांना मिळाल्याचे समोर आले आहे. अंदाजे 50 ते 55 टक्के नोकऱ्यांवरच गोमंतकीयांना समाधान मानावे लागले आहे. मोपासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या त्या कुटुंबांना नोकऱ्या मिळाल्या की नाहीत याचा स्पष्ट खुलासा अद्याप होऊ शकलेला नाही.
उच्च पदे बिगरगोमंतकीयांना
सरकारी सुत्रांनी देलेल्या माहितीनुसार मोपा विमानतळावर 2876 जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्यातील 1285 जण बिगरगोमंतकीय आहेत तर 1591 जण गोमंतकीय आहेत. सुरक्षा रक्षक, लोडर्स, फायर फायटर, ट्रॉली ओढणारे-नेणारे व इतर नाममात्र पदे गोमंतकीयांच्या वाट्याला आली आहेत. उर्वरित वरची पदे बिगरगोमंतकीयांच्या हातात गेली आहेत.
एकूण सुमारे 30 ते 35 कंपन्यांनी मोपा विमानतळावर नोकरभरती केली असून त्या नोकऱ्या कायम स्वरूपी आहेत की हंगामी किंवा कंत्राटी हे समोर आलेले नाही.
जीएमआर कंपनीने 293 गोमंतकीयांना नेमले असून 238 जण परप्रांतीय आहेत. जीएएल कंपनीने त्यातल्या त्यात जास्त गोमंतकीयांना प्राधान्य दिले असून 151 जणांना नोकऱ्या दिल्या तर 18 पदांवर परप्रांतीय नेमले आहेत. एक्वायल एअरपोर्ट कंपनीने बिगरगोमंतकीयांना प्राधान्य देताना 142 जणांना नोकऱ्या बहाल केल्या तर फक्त 25 गोमंतकीयांना नोकऱ्या दिल्याचे समोर आले आहे. अरूण एव्हीएशन कंपनीने 40 परप्रातीयांना नोकरीत घेतले असून 24 गोमंतकीयांना नोकरी दिली आहे. एटीएच एअरपोर्ट सेवा कंपनीत 36 गोमंतकीयांची भरती झाली असून 10 जण बिगरगोमंतकीय आहेत. सेलेबी एअरपोर्ट सेवा कंपनीने 200 बिगरगोमंतकीयांना नोकऱ्या दिल्या तर फक्त 83 गोमंतकीयांना नोकऱ्या बहाल केल्या आहेत. एलएलआर फॅसीलीटी सर्व्हीस कंपनीने 152 गोमंतकीयांना सेवेत घेतले तर 99 परप्रांतीयांना नोकऱ्या देऊ केल्या आहेत. एनक्लेम हॉस्पिटॅलिटी कंपनीने 43 गोमंतकीय तर 40 बिगरगोमंतकीयांना नोकरीत घेतले आहे. मेगावाईट कन्स्ट्रक्शन कंपनीने 98 परप्रांतीयांना नोकऱ्या दिल्या तर 15 गोमंतकीयांना सेवेत घेतले आहे. ‘व्हाईट कलर’ जॉब बिगरगोमंतकीयांना मिळाल्याचे सुत्रांनी समूद केले आहे.









