घरोघरी सर्वेक्षण सुरू, नागरिकांना हलविण्याची तयारी
वृत्तसंस्था/ डेहराडून
उत्तराखंड राज्यातील जोशीमठ येथे जमीन खचण्यास प्रारंभ झाल्याने तेथील 3 हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्मयात आले आहे. परिस्थिती पाहण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले असून अतिधोक्मयात असणाऱया स्थानांवर वास्तव्यास असणाऱया कुटुंबांना अन्यत्र हलविण्याची तयारी करण्यात येत आहे. तसेच या स्थानी सुरू असलेले अनेक प्रकल्प थांबविण्यात आले आहेत.
चारधाम महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रोखण्यात आला असून पुढील आदेशापर्यंत त्यावर काम चालू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला 12 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्याचे काम थांबल्यास प्रकल्प खर्चही वाढणार आहे. हा 889 किलोमीटर लांबीचा प्रकल्प उत्तराखंडातील चारधाम तीर्थस्थळांना जोडणार आहे. जोशीमठाच्या विभाग 33 आणि 34 येथे आपत्ती निवारण कायद्यानुसार साहाय्यता प्रदान करण्यात येणार आहे.
विद्युत प्रकल्पही लांबणीवर
एनटीपीसीचा 520 मेगावॅट क्षमतेचा तपोवन-विष्णूगड हा जलविद्युत प्रकल्प काही काळासाठी लांबणीवर टाकण्यात आला आहे. यामुळे वीजनिर्मितीचे कार्य उशिरा सुरू होणार असून उत्तर प्रदेशलाही यातून पुरविली जाणारी वीज लांबणीवर पडली आहे. तसेच जोशीमठ-अवली हा रोप वे सध्या पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. जोशीमठामध्ये सुरू असलेली सर्व बांधकाम थांबविण्यात आली असून त्यामुळे आणखी चार प्रकल्प प्रलंबित झाले आहेत.

घरांना तडे
जोशीमठाच्या परिसरात राहणाऱया अनेक कुटुंबांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. भिंतींना मोठे तडे गेले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जोशीमठ ते वृंदावन हा बायपास रस्ता उशिरा पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच त्याची लांबी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रस्त्याचे 13 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तथापि, पुढील कामाला विलंब होणार असल्याने या 13 किलोमीटरच्या रस्त्याचाही फारसा उपयोग करणे अशक्मय आहे.
धवली गंगा प्रकल्पावर प्रश्नचिन्ह
चमोली जिल्हय़ातील धवली गंगा नदीवर 2 हजार 978 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. गेल्या वषी हिमनदीचा स्फोट झाल्याने या प्रकल्पाच्या काही भागाची हानी झाली होती. फेब्रुवारी 2021 मध्ये या भागात पाणी शिरल्याने 200 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे येथील प्रकल्पही थांबले आहेत.
जोशीमठाचे स्खलन का?
जोशीमठ ही नागरी वस्ती ठिसूळ जमिनीवर करण्यात आली आहे. ही जमीन डोंगराचा एक भाग धसल्यामुळे निर्माण झाली आहे. ही डोंगर धसण्याची घटना एक हजार वर्षापूर्वी घडली असावी, असे अनुमान आहे. या जमिनीवर घरे आणि मानवी वस्ती झाल्याने घरे खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. जमिनीतून निरनिराळय़ा प्रकारचे आवाज येत असल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. प्रशासनाने उपाय योजण्याचा प्रयत्न चालविला असला तरी आतापर्यंत म्हणावे तसे यश मिळालेले नाही. परिस्थिती न सुधारल्यास येथे वास्तव्यास असणाऱया अनेक नागरिकांना सुरक्षित जागी नेण्यात येणार आहे.









