प्रियोळ टॅकरमुक्त करीत प्रत्येक घरासाठी नळाचे पाणी : 3.07 कोटी खर्चुन जलवाहिनी बदलण्याचा कामाचा शुभारंभ
वार्ताहर /सावईवेरे
प्रियोळ मतदारसंघातील सावईवेरे आणि वळवईतील हजारो घरांना नळाद्वारे पिण्यायोग्य पाण्याची पुरविणे आपले स्वप्न आहे. शितोळे तळ्यावरील प्रस्ताव व मुर्डी येथील म्हादई नदीवरील 108 कोटी रूपयाचा प्रकल्प हा प्रियोळसाठी मास्टर प्लान आहे. जो पुढील 50-60 वर्षासाठी वेरे वाघुर्मे आणि आसपासच्या सर्व गावांच्या पाण्याचा गरजा पुर्ण करेल असे आश्वासक उद्गार कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी पाईपलाईन सुधारणेच्या कामाचा पायाभरणी सोहळ्यात काढले. वेरे वाघुर्मे ग्रामपंचायत क्षेत्रातील कावंगाळ, मधलावाडा, कोणिर, सावई ते घाणो तसेच वळवई ग्रामपंचायत क्षेत्रात सुमारे रू. 5 कोटी खर्चुन पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन जलवाहिनी घालण्यात येणार असून त्याचा शुभारंभ सोहळा वेरे वाघुर्मे पंचायतीच्या प्रांगणात थाटात संपन्न झाला. यावेळी जि. प.सदस्य श्रमेश भोसले, प्रिया च्यारी, वेरे वाघुर्मे सरपंच शोभा पेरणी, उपसरपंच बाबू गावडे व इतर पंचसदस्य उपस्थित होते.
पाईपलाईन सुधारणेनंतर नळाचे पाणी हजार कुटूंबांना
पाईपलाईनच्या सुधारणेचे काम आणि कावंगाळ टाकीतून काम करण्यासाठी 3.07 कोटी खर्च अपेक्षित आहे. ज्यामध्ये 7 किमी लांबीची पाईपलाईन टाकली जाईल. यामध्ये 5 किमी लांबीची 250 मि.मी. डीआय आणि 2 किमी लांबीची 200 मिमी. डीआय पाईपलाईन कावंगाळ टाकीपासून वळवई, सावईवेरे, आणि घाणो मधील पंचायतीचे, वळवई पर्यतचा भाग व्यापते. या प्रकल्पामुळे सुमारे 1000 कुटूंबांना योग्य नळाच्या पाण्याची सुविधा मिळेल अशी माहिती पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रमानंतर दिली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी, जि. प. सदस्य श्रमेश भोसले, सरपंचा शोभा पेरणी, वळवईचे सरपंच विनायक वेगुर्लेकर, तिवरे पंचायतीचे सरपंच जयेश नाईक, उपसरपंच बाबू गावडे, पंच अक्षय नाईक, रोहन तारी, नवनाथ वेलकासकर, लोचन नाईक, स्वाती पालकर, हर्षा गावडे, पाणी खात्याचे सहाय्यक अभियंता श्री जांबावलीकर आदी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते श्रीफळ वाढवून तसेच मंत्र्याच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करून जलवाहिन्या घालण्याचा कामाचा शुभारंभ सोहळा पार पडला.
प्रियोळ मतदारसंघ टॅकरमुक्त
यावेळी पुढे बोलताना गोविंद गावडे म्हणाले की गोव्यातील चाळीस मतदासरसंघापैकी सर्वाज जास्त अडचणी व समस्या माझ्या प्रियोळ मतदारसंघात होत्या. या मतदरासंघातील मी निवडून आल्यास त्या संधीचे सोने करण्याची धमक माझ्या कार्यकर्त्याकडून दाखवून दिली. पाण्यासाठी महिलांना किती त्रास सहन करावे लागत होते याची जाणीव मला होती. पाण्यासाठी ग्रामिण भाग त्रस्त होता. टॅकरची वाट पाहावी लागत होती. स्वाभिमानी व अभिमानी कार्यकर्त्याच्या प्रयत्नावर पाण्यासारखा मुलभूत गरजा पुर्ण करण्याचा प्रयत्न झाला. या दोन तीन पंचायत क्षेत्रातील सुमारे 80 टक्के काम पुर्ण झालेले आहे. मुर्डी खांडेपार भागात म्हादई नदीवर 108 कोटी रूपये खर्चाची योजना असून तेथे बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे.
शितोळे तळ्यावर 30 एमएलडी जलशुद्धिकरण प्रकल्प
शितोळे तळ्याच्या प्रकल्पासाठी साळगावकरांकडून 2700 चौ. मिटर जागा मोफत मिळाली असूत त्dया प्रकल्पासाठी 27 कोटी रूपये खर्च होणार आहे. या भागात पर्यटन कसे येतील, बेरोजगारी कशी कमी होईल याचाही विचार आमच्या सरकारनी केलेला आहे. गोवा हे भारतात आदर्श राज्य बनविण्याचा संकल्प सरकारने केला आहे. त्यासाठी जनतेच्या सहकार्याची आणि सहभागाची गरज असल्याचे त्यांनी आवाहन केले. शितोळे तळ्याजवळ 30 एमएलडी जलशुद्धिकरण योजना उभारण्यासाठी सरकारची योजना आहे. ज्याचे सुमारे 7000 चौरस मिटर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. सुरवातीला हा प्रकल्प 12 एमएलडी क्षमतेने सुरू होईल आणि शेवटी गरजेनुसार किंवा पाण्याच्या गरजेनुसार तो 30 एमएमलडीपर्यंत वाढवला जाईल असे मंत्री गावडे म्हणाले. यावेळी बोलताना प्रिया च्यारी म्हणाल्या की आजच्या काळात पाणी आणि वीज त्याच्यांशिवाय जगणे कठीण आहे. पाण्यासारखे प्रश्न सुटण्यासाठी सर्वानी लोकप्रतिनिधीना सहकार्य करावे असे आवाहन करून महिलांनी दु:खे महिलांनाच समजतात असे सांगितले. श्रमेश भोसले म्हणाले की आजच्या समाजात मुलभूत गरजा कोणत्या आहेत याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी. आजच्या पिढीप्रमाणे पुढील पिढ्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. प्रत्येक कामात अडचणी येत असतात पण त्या सर्व अडचणींवर मात करून पुढे जाणे हेच लोकप्रतिनिधीचे काम आहे. यावेळी माजी सरपंच सत्यवान शिलकर यांनीही विचार मांडले. स्वागतगीताने सोहळ्यास प्रारंभ झाला. सरपंच शोभा पेरणी यांनी प्रास्ताविक व स्वागतपर विचार मांडले. सुत्रसंचालन दीपक वेलकासकर यांनी केले. बाबू गावडे यांनी आभार मानले.









