विविध ठिकाणी सजविलेल्या म्हशी पाहण्यास नागरिकांनी केली गर्दी
बेळगाव : रंगविलेली शिंगे, त्यांना बांधलेली मोरपिसे, गळ्यात शोभिवंत माळा, पायात घुंगरांचा पट्टा आणि ऐटीत चाललेल्या म्हशी असे चित्र दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने शहराच्या सर्रास भागात दिसून आले. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हशी पळविण्याची परंपरा बेळगावमध्ये सुरू असून मंगळवारीही शेतकरी तसेच पशुपालकांनी म्हशी पळवून आनंद लुटला. वर्षभर दूध तसेच शेतीची कामे करण्यासाठी शेतकरी जनावरांची मदत घेतात. दिवाळी पाडव्यादिवशी या म्हशींना सजवून त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. दुचाकीच्या रेसच्या आवाजात म्हशी पळविण्याचा आनंद लुटला जातो. शहराच्या मध्यवर्ती भागासोबतच उपनगरांमध्येही मंगळवारी मोठ्या प्रमाणात म्हशी पळविण्यात आल्या. शहरातील चव्हाट गल्ली, कंग्राळ गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, कोनवाळ गल्ली, पांगुळ गल्ली, बापट गल्ली, भातकांडे गल्ली, कडोलकर गल्ली, कुलकर्णी गल्ली, शिवाजीनगर, गांधीनगर, शहापूर, वडगाव, अनगोळ, नानावाडी तसेच गोवावेस परिसरात म्हशी पळविण्यात आल्या. यानिमित्त काही ठिकाणी स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. म्हशींना सुरेखपणे सजविलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. दुचाकीच्या आवाजात म्हशींना एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत पळविले जात होते. हा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.









