वृत्तसंस्था /लखनौ
‘आदिपुरुष’ या वादग्रस्त चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ पीठाने चपराक लगावली आहे. हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. मात्र त्यातील पात्रांच्या तोंडी असभ्य आणि अश्लाघ्य भाषा असून रामायणाच्या कथेचे विकृतीकरण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या चित्रपटाच्या वादग्रस्ततेवर बोट ठेवत न्या. राजेशसिंग चौहान आणि न्या. श्रीप्रकाश सिंग यांनी या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांना अनेक प्रश्न विचारले. तसेच, या चित्रपटाला मान्यता दिल्याच्या संदर्भात सेन्सॉर मंडळालाही धारेवर धरले. ऐतिहासिक महान व्यक्तीमत्वांच्या तोंडी न शोभणारी भाषा या चित्रपटात घालण्यात आली आहे. सेन्सॉर मंडळाने हे मान्य कसे केले ? अशा व्यक्तीमत्वांचा अपमान करण्याचा अधिकार चित्रपट निर्मात्यांनी नाही, असे ठणकावत न्यायालयाने या चित्रपटाच्या सुधारणापत्राला मान्यता दिली.
धर्मग्रंथांची नालस्ती नको
रामायण, महाभारत, भगवद्गीता, बायबल, कुराण, गुरु ग्रंथ साहिब यांसारख्या धर्मग्रंथांची नालस्ती होईल, अशा प्रकारचे चित्रपट बनवू नका. पुढच्या पिढ्यांना आपण कोणती शिकवण देत आहात याचे आपल्याला भान आहे का, असा थेट प्रश्न न्यायालयाने निर्माते आणि सेन्सॉर मंडळाला विचारला. या याचिकेवर पुढची सुनावणी 27 जून या दिवशी होणार असून न्यायालयाकडून निर्माते आणि दिग्दर्शकांना दिशानिर्देश दिले जातील, अशी शक्यता आहे.









