वैशिष्ट्यापूर्ण वेशभूषा ठरल्या लक्षवेधी : दुर्गादेवीच्या मूर्तींचे शुक्रवारी सकाळपर्यंत विसर्जन
बेळगाव : बेळगाव शहरातील कॅम्प येथे वैशिष्ट्यापूर्ण पद्धतीने दसरोत्सव साजरा केला जातो. विजयादशमी दिवशी कॅम्प येथील महत्त्वाच्या पाच देवींची भव्य मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीचे आकर्षण असते ढोलताशा वादन तसेच राक्षसांचा वेश परिधान केलेल्या व्यक्ती. अतिशय वेगळ्या पद्धतीने काढली जाणारी ही मिरवणूक पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कॅम्प भागात गर्दी दिसून आली. कॅम्प परिसरातील फिश मार्केट येथील महामाता कुंतीदेवी, बी मद्रास स्ट्रीट येथील दुर्गा मुत्तूमरिअम्मा देवी, खानापूर रोड येथील मरिअम्मा देवी, आर. ए. लाईन येथील कुलकतम्मा देवी व तेलगू कॉलनी येथील मरिमाता-दुर्गामाता या देवींची नवरात्रीमध्ये विशेष पूजा केली जाते.
विजयादशमी दिवशी या देवींची भव्य व सजवलेल्या रथांमधून मिरवणूक काढली जाते. पारंपरिक पद्धतीने ढोलवादन करून देवींची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. फिश मार्केट, हाय स्ट्रीट, पोलीस क्वॉर्टर्स, धर्मवीर संभाजी चौक, वनिता विद्यालय, सेंट झेवियर्स, कॅटल रोड मार्गे कॅम्प येथे मिरवणुकीची सांगता झाली. एलईडी लाईट्सच्या प्रकाशझोतात भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. राक्षसांची वेशभूषा केलेल्या व्यक्तींचे नृत्य पाहण्यासाठी शहरात मोठी गर्दी झाली होती.
शुक्रवारी सकाळपर्यंत विसर्जन मिरवणुका
बेळगाव शहरामध्ये शंभरहून अधिक मंडळांकडून दुर्गादेवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जात आहे. गुरुवारी दुपारपासून दुर्गादेवीच्या मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक सुरू होती. ढोलताशांच्या गजरात तसेच डीजे दणदणाटामध्ये मिरवणुका काढण्यात आल्या. यामुळे कपिलेश्वर विसर्जन तलाव, जक्कीनहोंड विसर्जन तलाव, अनगोळ, जुने बेळगाव येथे विसर्जन केले जात होते. काही मंडळांची शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत विसर्जन मिरवणूक सुरू असल्याचे दिसून आले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत विसर्जन करण्यास भाग पाडले.









