पश्चिम भागातील मराठी शाळा शिक्षकांविना ओस पडण्याची भीती : मराठी शाळा बंद करून मराठी भाषा संस्कृतीवर घाला घालण्याचे काम
खानापूर : तालुक्मयातील शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू झाली असून बदली झालेल्या शिक्षकांना तालुका शिक्षणाधिकारी कार्यालयातून मोकळीक देण्यात येत आहे. आतापर्यंत तालुक्याअंतर्गत शंभर तर तालुक्याबाहेर दहा तर जिल्ह्याबाहेर सहा शिक्षकांना मोकळीक देण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्मयातील पश्चिम भागातील शाळा शिक्षकाविना ओस पडण्याची भीती व्यक्त होत आहे. कौन्सिलिंगनुसार तालुक्यातील शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानुसार शिक्षकांनी आपल्या बदल्या झालेल्या ठिकाणी जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. दोन दिवसांपासून बदली झालेल्या शिक्षकांना मोकळीक देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्मयातील प्राथमिक शिक्षकांचा बोजवारा उडणार असून प्राथमिक शिक्षणाचा पायाच ढासळणार आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे होते. या सर्व बदली प्रक्रिया निदान मार्च अखेरपर्यंत तरी थांबवणे गरजेचे होते. मात्र शिक्षकांनी आपली बदली झाल्यामुळे मोकळीक घेण्यासाठी घाई करून तालुका शिक्षणाधिकारी कार्यालयातून मोकळीक घेतलेली आहे. तसेच तातडीने ही बदली प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
गत तीन वर्षापासूनब दली प्रक्रिया रखडली
तालुक्मयात सध्या 507 शिक्षकांची गरज असून शिक्षक भरती प्रक्रिया गेल्या तीन वर्षापासून करण्यात आली नसल्याने आहे त्या शिक्षकांवरच शाळा सुरू आहेत. आधीच तालुक्यात शिक्षकांची कमतरता होती. तसेच अतिथी शिक्षकांवर काही शाळा चालल्या होत्या. त्यातच बदली प्रक्रिया सुरू झाल्याने पश्चिम आणि दुर्गम खेड्यातील शाळा या बदली प्रक्रियेमुळे पूर्णपणे शिक्षकाविना ओस पडणार आहेत.
शिक्षणासाठी मुलांना बाहेरगावी ठेवण्याचा पालकांचा विचार
या शिक्षकांच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या पाल्याच्या भविष्याचा विचार करून काही विद्यार्थ्यांना नातेवाईकांकडे अथवा बाहेर शिक्षणासाठी पाठवण्यात आल्याने शाळांतील विद्यार्थी कमी झाले आहेत. त्यामुळे भविष्यात दुर्गम भागातील तसेच पश्चिम भागातील शाळा कायमस्वरुपी बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. आतापर्यंत पटसंख्येचे कारण देत तालुक्यातील सहा मराठी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
समितीच्या निवेदनाकडेही दुर्लक्ष
तालुक्यातील शैक्षणिक नुकसानीबद्दल म. ए. समितीने तसेच विविध संघटनांनी शिक्षकांच्या बदल्या रोखण्यासाठी निवेदने दिली होती. मात्र पालकमंत्र्यांनी तसेच जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी अजिबात विचार न करता शिक्षकांच्या बदली प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात केल्याने तालुक्यातील मराठी शिक्षणाचा बोजवारा उडणार आहे, यात तिळमात्र शंका नाही.
तालुक्यात 507 शिक्षकांची कमतरता
तालुक्यात 507 शिक्षकांची कमतरता आहे. यासाठी शिक्षक भरती प्रक्रिया होणे गरजेचे आहे. उच्च प्राथमिक शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. मात्र लोअर प्राथमिक शाळेतील शिक्षकांची नेमणूक करण्यात आली नसल्याने ग्रामीण भागातील लोअर प्रायमरी शाळा शिक्षकाविना बंद पडण्याचा धोका आहे. कर्नाटक सरकार जाणीवपूर्वक खानापूर तालुक्यातील मराठी शिक्षकांच्या नेमणुका करण्यास दुजाभाव करत आहेत. त्यामुळे तालुक्यातील मराठी शाळा बंद करून मराठी भाषा संस्कृतीवर घाला घालण्याचे काम कर्नाटक सरकार वेगळ्या पद्धतीने करत आहे.
आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रयत्नांची गरज
याबाबत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी पालकमंत्री तसेच शिक्षणमंत्र्यांना भेटून ही बदली प्रक्रिया किमान मार्चपर्यंत थांबवणे गरजेचे होते. परंतू यात विठ्ठल हलगेकर यांचे प्रयत्न कमी पडल्याचे दिसून येत आहे. आमदार विठ्ठल हलगेकर हे स्वत: शिक्षक म्हणून सेवा बजावलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबद्दल त्यांना कल्पना आहे. तालुक्यातील पश्चिम भागातील शाळाच शिक्षकाविना ओस पडणार असल्याने या शाळा टिकवण्यासाठी आमदारांकडून वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या काही वर्षात पश्चिम भागातील तसेच सर्वदूरवरच्या खेड्यातील शाळा कायमस्वरुपी बंद पडण्याची भीती पालकांतून व्यक्त होत आहे.









