आमदार दिगंबर कामत यांची माहिती, प्रभाग 12 मधील सुशोभिकरण कामांचे उद्घाटन
मडगाव : मडगावात सुशोभिकरणाची पहिल्या टप्प्यात चार ठिकाणी कामे झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आर्थिक मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे. लवकरच ही कामे मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती आमदार दिगंबर कामत यांनी दिली. मडगाव नगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 12 मधील सुमारे 17 लाख ऊपये खर्चाच्या सुशोभिकरण कामांचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी आमदार कामत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर, स्थानिक नगरसेवक सगुण उर्फ दादा नाईक, नगरसेवक महेश आमोणकर, पालिका अभियंता मनोज आर्सेकर, साहाय्यक अभियंता श्रीकांत लवंदे, कनिष्ठ अभियंता सज्जन गावकर तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. रावणफोंड येथील उ•ाणपुलाचे काम सुरू आहे. कोकण रेल्वेला आराखडा सादर करण्यात आला आहे. त्यास रेल्वेच्या केंद्रीय समितीकडून मंजुरी मिळवावी लागते. वीजवाहिन्या काम करताना बाजूला कराव्या लागणार. त्यासाठी राज्य सरकारने 4 कोटींचा कोकण रेल्वेकडे भरणा केला आहे, असे आमदार कामत यांनी सांगितले. एसजीपीडीए मार्केटमधील बायोमिथेनेशन कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद स्थितीत नसून देखभालीसाठी तो दोन दिवस बंद ठेवण्यात आला आहे. प्रकल्पात साचलेले लिचेड (सांडपाणी) काढण्याचे काम सुरू असल्याने तो दोन दिवस बंद ठेवण्यात आला आहे, असे यावेळी मुख्याधिकारी शंखवाळकर यांनी स्पष्ट केले.
बहुमजली पार्किंग प्रकल्पाची निविदा आठवडाभरात
पालिका इमारतीमागील जुन्या मासळी मार्केट जागेतील नियोजित पार्किंग प्रकल्पाची फाईल प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. तिला लवकरच मंजुरी मिळणार आहे. येत्या आठवडाभरात प्रकल्प उभारण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे, अशी माहिती कामत यांनी यावेळी दिली. सदर बहुमजली पार्किंग प्रकल्पात वरचा मजल्यावर रेस्टॉरंटसाठी आधीच प्रयोजन करण्यात आले होते. मुख्य आराखड्याचा तो भाग होता. रेस्टॉरंट आले, तर काय बिघडणार, त्यातून उलट पालिकेला महसूल प्राप्त होईल, असे आमदार कामत एका प्रश्नावर म्हणाले. मडगाव पालिकेच्या वारसा इमारतीची डागडुजी तसेच सुशोभिकरणाचे काम जी-सुडामार्फत करण्यात येणार आहे. पालिकेकडून त्यासाठी लवकरच पत्रव्यवहार केला जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.









