आमदार महेश शिंदेंनी दिल्लीत घेतली नितीन गडकरीची भेट
प्रकाश कुंभार/ कोरेगाव
कोरेगाव शहराच्या प्रस्तावित रिंगरोडसह सातारा-लोणंद महामार्गाच्या विविध विषयांशी निगडित प्रश्न घेऊन आमदार महेश शिंदे यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. कोरेगाव मतदारसंघाशी विशेषतः सातारा जिह्याविषयी आस्था असलेले मंत्री गडकरी यांनी कोरेगाव रिंगरोडसह सातारा-लोणंद महामार्गावरील वडूथ आणि वाढे येथे ब्रिटिशकालीन पुलांच्या जागी नवीन आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पूल बांधण्याचे निर्देश तत्काळ आपल्या मंत्रालयाला दिले. एकूणच येत्या काही महिन्यात अनेक वर्ष रखडलेला वाहतुकीचा प्रश्न आता निकाली निघणार आहे.
सातारा जिह्यात साखर कारखान्याचे मोठे जाळे विस्तारले आहे. कोरेगाव तालुक्यासह सातारा आणि खटाव तालुक्यात ऊस उत्पादन मोठय़ा प्रमाणावर असल्याने सुमारे 15 ते 16 साखर कारखान्यांची वाहतूक कोरेगाव शहरातून अहोरात्र सुरू असते. त्याचबरोबर कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशला जोडणारा जवळचा मार्ग कोरेगाव शहरातून जात असल्याने अवजड वाहतूक देखील सुरू असते. एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी सुमारे तास ते दीड तास वेळ जातो. शहरात प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक महाविद्यालये ही महामार्गालगत असल्याने विद्यार्थ्यांना देखील मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागते. त्यांची सुरक्षा देखील महत्त्वाची बाब बनली आहे. वाढते अपघात रोखण्याबरोबरच वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे आवश्यक बनले होते.
कोरेगाव शहरातील वाहतूक समस्या कायमस्वरूपी निकालात काढण्याच्या उद्देशाने आणि मतदारसंघातील कायम रहदारीचा सातारा-लोणंद-पुणे महामार्गावरील वडूथ येथे कृष्णा नदीवरील पूल आणि वाढे येथील कृष्णा नदीवरील पूल नव्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बांधण्यासाठीचे प्रस्ताव घेऊन आमदार महेश शिंदे यांनी मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्लीतील कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी निवेदन सादर करत असतानाच धोकादायक वाहतुकीची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. कोरेगाव शहरासाठी बाह्य वळण मार्ग अर्थात बायपास करणे नितांत गरजेचे असल्याचे त्यांनी विविध उदाहरणे देऊन सांगितले. मंत्री गडकरी यांनी तत्काळ आपल्या मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱयांना कोरेगाव बाह्यवळण मार्गाबाबत निर्देश दिले. यावेळी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या अनुषंगाने उभयतांमध्ये चर्चा झाली.
रिंगरोड ठरणार कोरेगावच्या नवविकासाचा शिल्पकार
कोरेगाव ही ब्रिटिशकाळापासून बाजारपेठ म्हणून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परराज्यात देखील प्रसिद्ध आहे. जुनी रेल्वे कोरेगाव शहरातून स्थलांतरित झाल्यानंतर संपूर्ण शहराचा ताण हा पूर्वाश्रमीच्या सातारा-पंढरपूर राज्य मार्गावर आणि आताच्या सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर आला आहे. शहराचा विस्तार चारही बाजूला झाला असून नवीन वसाहती दिवसागणिक उभारल्या जात आहेत. वाढती रहदारी हा महामार्ग आता सहन करू शकत नाही. राज्यातील अनेक शहरांचा विकास हा रिंगरोडच्या माध्यमातून झाला आहे, ही बाब लक्षात घेऊन कोरेगाव शहरासाठी नव्याने रिंगरोड करण्यात यावा तो अत्याधुनिक यंत्रणेच्या साह्याने नॅशनल हायवे अथॉरिटीने करावा यासाठी आमदार महेश शिंदे हे प्रयत्नशील होते. त्यांनी याबाबत अभ्यासपूर्ण मांडणी मंत्री गडकरी यांच्यासमोर केली, त्यांनाही ही बाब पटली आणि त्यांनी आपल्या अधिकाऱयांना कोरेगावचा रिंगरोड बनवायचा आहे, त्यादृष्टीने कामाला लागा असे स्पष्ट निर्देश दिले. एकूणच आता नवीन रिंगरोड कोरेगाव शहराच्या विकासाला दिशा देणारा ठरेल, हे मात्र निश्चित.
ब्रिटिशकालीन पुलांना केला जाणार अलविदा
उत्तरेकडील राज्यांमधून दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाहतूक होते, त्यात अवजड वाहतुकीचा समावेश आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून सातारा-लोणंद-पुणे हा महामार्ग जात आहे. 24 तास या महामार्गावर मोठी रहदारी असते. सातारा तालुक्यात वडूथ येथे कृष्णा नदीवर आणि वाढे येथे वेण्णा नदीवर ब्रिटिशकालीन पूल आहेत. त्यांची देखील आयुमर्यादा आता संपली आहे. वडूथ आणि वाढे येथे नव्याने अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने पुलांची उभारणी करण्याची मागणी करतात मंत्री गडकरी यांनी ती मान्य केली. त्यामुळे आता या मार्गावरील रहदारीचा प्रश्न निकालातच निघाला आहे. आमदार महेश शिंदे यांनी कोणताही गवगवा न करता अभ्यासपूर्ण मांडणी करत पुलांचा विषय मार्गी लावल्याने समाधान व्यक्त होत आहे. एकूणच आता ब्रिटिशकालीन दोन पुलांना अलविदा म्हणावे लागणार आहे.








