फेरीवाले-बैठ्या विक्रेत्यांची भर : वाहनधारक-पादचाऱ्यांची डोकेदुखी, शिस्त लावण्याची गरज
बेळगाव : शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनू लागला आहे. वर्दळीच्या ठिकाणी फेरीवाले, भाजी विक्रेते आणि बैठ्या व्यावसायिकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे. त्यामुळे वाहनधारक आणि पादचाऱ्यांनाही ये-जा करणे मुश्कील बनू लागले आहे. पोलीस खात्याने या व्यावसायिकांना शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे. शहरातील खडेबाजार, गणपत गल्ली, समादेवी गल्ली, भेंडीबाजार, काकतीवेस, मारुती गल्ली आदी ठिकाणी बैठ्या आणि फेरीवाल्या व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. बस स्टँड सिग्नलजवळ खडेबाजारमध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर बेकायदेशीरपणे फेरीवाले आणि बैठे व्यावसायिक ठाण मांडून बसत आहेत.
त्यामुळे सिग्नलवरून शहरात प्रवेश करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: रिक्षा, दुचाकी आणि पादचाऱ्यांना चालणेही अशक्य होऊ लागले आहे. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी कॉर्नर आणि चौकाचौकात फळे, भाजीपाला आणि इतर साहित्य विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या व्यावसायिकांमुळे शहरातील वाहतूक कोंडीची डोकेदुखी वाढू लागली आहे. शहरात जागा मिळेल त्या ठिकाणी लहान व्यावसायिक बसू लागले आहेत. त्यामुळे वाहने चालविणे कठीण होऊ लागले आहे. सिग्नलवर आधीच गर्दी असते. त्यातच लहान बैठ्या व्यावसायिकांमुळे ये-जा करणे धोक्याचे बनू लागले आहे. शहरातील फेरीवाले, भाजी विक्रेते आणि बैठ्या व्यावसायिकांना शिस्त लावून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.









