सभापती रमेश तवडकर यांनी दिलेली माहिती : काणकोणच्या अनेक समस्या लवकरच सुटणार, केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीसाठी केलेला दौरा फलदायी
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या जलद रेल्वेगाड्यांना थांबा देण्याच्या काणकोणवासियांच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली असून येणाऱ्या दोन महिन्यांत हा प्रश्न सुटणार आहे. रेल्वे थांब्याच्या मागणीबरोबरच ज्या अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी प्रतिनिधीमंडळ दिल्लीला गेले होते त्यातील बऱ्याच मागण्या येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहे. हा अत्यंत समाधानकारक असा दौरा होता, अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी काणकोणच्या सरकारी विश्रामधामात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. कोकण रेल्वेचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी खास अधिकाऱ्याची नियुक्त केली असून त्यांच्यामार्फत याचा पाठपुरावा होईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो, काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, सचिव दिवाकर पागी, महिला मोर्चाच्या चंदा देसाई, खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई, श्रीस्थळ जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनय तुबकी, शाबा गावकर व अन्य नागरिक उपस्थित होते. या दौऱ्यात केंद्रीय रस्ता वाहतूकमंत्री नितीन गडकरी, महिला आणि बालविकासमंत्री स्मृती इराणी, जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, अर्जुन राम मेघावल, ग्रामीण विकासमंत्री फगनसिंग कुलस्ते, आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा यांची या प्रतिनिधीमंडळाने भेट घेतली आणि उर्वरित राज्याबरोबर काणकोणातील अनेक समस्या त्यांच्यासमोर मांडून त्यांचे निराकरण करण्याची मागणी केली, असे तवडकर यांनी सांगितले.
त्यात करमल घाट रस्त्याचे ऊंदीकरण आणि चौपदरी रस्त्याची महत्त्वाची मागणी होती. या ठिकाणी बोगदा न करता चौपदरी रस्ता करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू असून भूसंपादन प्रक्रियेसाठी 77 कोटी रु. मंजूर करण्यात आले आहेत. त्याची निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. बेंदुर्डे ते काणकोण या रस्त्याच्या रूंदीकरणाचा प्रश्न महत्वाचा आहे, अशी माहिती त्यांनी दिली. चार रस्ता येथे मनोहर पर्रीकर बगलमार्गाच्या जोडरस्त्यावर छत्रपती शिवाजी महारांजाचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचे काणकोणवासियांचे स्वप्न असून रस्ता वाहतूकमंत्री गडकरी यांनी या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे ही मागणी लवकरच पूर्ण होणार आहे, असे तवडकर यांनी सांगितले.
अंगणवाड्यांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन
गोव्यातील बऱ्याच अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारती नाहीत. त्याचप्रमाणे देखभालीच्या समस्या आहेत. राज्य सरकारमार्फत हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मंत्री स्मृती इराणी यांनी दिले आहे. गालजीबाग, तळपण किनाऱ्यांवर पावसाळ्यात मोठया प्रमाणात वाळूची धूप होत असते. त्याचा परिणाम किनाऱ्यावरील घरांवर होत असतो. त्याचा विचार करून या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासमोर ठेवण्यात आला आहे. काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढविणे त्याचप्रमाणे अन्य महत्त्वाच्या सुविधा केंद्र सरकारच्या योजनांतून देण्यासंबंधीचे एक निवेदन आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना देण्यात आले आहे, असे तवडकर यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण विकासमंत्री कुलस्ते यांच्यासमोर ग्रामीण विकासाचे अनेक प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. याच वेळी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचीही भेट घेण्यात आली. संपूर्ण दौरा अत्यंत फलदायी असा राहिला. या दौऱ्यात संतोष लोलयेकर आणि राजेंद्र बोरकर हे अधिकारी सहभागी झाले होते, अशी माहिती सभापती तवडकर यांनी दिली. या दौऱ्यात सहभागी झालेल्या नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर यांनीही हा अत्यंत समाधानकारक असा अनुभव असून सभापतींच्या प्रयत्नांमुळे बऱ्याच समस्या लवकरच सुटणार असल्याचे सांगितले. विशाल देसाई यांनी स्वागत केले, तर दिवाकर पागी यांनी आभार मानताना विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध न करता काणकोण मतदारसंघाच्या विकासासाठी सकारात्मकदृष्ट्या विचार करावा त्याचबरोबर सभापतींशी वेळोवेळी चर्चा करावी, असे आवाहन केले.
आदर्श ग्रामात सांस्कृतिक केंद्राचा प्रस्ताव
आमोणे येथील आदर्श ग्रामात कायमस्वरूपी सांस्कृतिक केंद्र सुरू करण्याचा विचार बऱ्याच वर्षांपासून चालू असून गोव्याच्या राहणीमानासंबंधी आणि कोल्हापूरच्या कण्हेरी मठाच्या धर्तीवर या ठिकाणी एखादे दालन उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. तो प्रस्ताव मंत्री मीनाक्षी लेखी व अर्जुन राम मेघावल यांच्यासमोर मांडण्यात आला आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या आदिवासी कल्याण खात्यातर्फे अतिरिक्त 30 कोटी रुपयांची योजना राबविण्याचा प्रस्ताव मंत्री अर्जुन मुंडा यांच्यासमोर ठेवण्यात आला आहे. त्या योजनेद्वारे आदर्श ग्रामात आणि अन्यत्र पाणी, रस्ते व अन्य समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे तवडकर यांनीं सांगितले.









