संविधान दिनानिमित्त डॉ. आंबेडकर यांना काँग्रेसकडून अभिवादन
प्रतिनिधी/ पणजी
भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान समर्पित करून खऱया अर्थाने लोकशाही राज्य आणले. आजही जगात भारताची राज्यघटना आदर्शवादी ठरते. याचे कारण म्हणजे डॉ. आंबेडकर यांनी प्रत्येक घटकाचा विचार करून प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्याचे अधिकार दिले. तरीही काही घटक आजही स्वतःच्याच फायदाचा विचार करताना जनतेला वेठीस धरत आहे, त्यामुळे डॉ. बाबासाहेब यांनी संविधानाद्वारे दिलेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुता या घटकांची आजही गरज आहे, असे मत काँग्रेस पदाधिकाऱयांनी व्यक्त केले.
पणजी येथे गोवा प्रदेश काँग्रेसतर्फे संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पुष्प वाहून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, फ्रान्सिन्स सार्दिन, ऍड. श्रीनिवास खलप, गौरीश अग्नी उपस्थित होते.
भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर विविध भाषा, जाती, धर्म यांना एकसंध ठेवणे गरजेचे होते. भारताची एकात्मता टिकवून ठेवण्याचे प्रमुख उद्दिष्ट त्याकाळी काँग्रेससमोर होते. काँग्रेसने स्वतंत्र भारताचा विकास करताना भारताची अखंडता राहण्याकडेही लक्ष दिले आणि त्यामुळेच आज भारताला जगात मान आहे. भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अहोरात्र कष्ट घेऊन जगातील आदर्शवादी घटना पूर्ण करून 26 नोव्हेंबर 1949 मध्ये देशाच्या स्वाधीन केली. आणि त्यामुळेच आजचा या दिवसाचे महत्त्व आहे, असे गौरीश अग्नी यांनी सांगितले.
या कार्यक्रमात पाटकर यांनीही भारताचे संविधान व काँग्रेसचे कार्य यावर प्रकाशझोत टाकला.









