कोल्हापूर / सौरभ मुजुमदार :
कोल्हापूरात संस्थानकालीत अनेक वारतू आजही ताठ मानेने उभ्या आहेत. माणसांच्या भाऊ गर्दीत त्या आपले अस्तित्व टिकवण्यासाठीच झगडत आहेत. त्यापैकीच एक वारतू राधाबाई बिल्डिंग. भाऊसिंगजी रोडवरील सी.पी.आर. हॉ स्पिटलसमोर दाट झाडीमध्ये उभी आहे. तिला आता चांगलाच उजाळा मिळणार आहे. कारण न्यायव्यवस्थेचे खंडपीठ येथे होत आहे. शेकडो हात या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी झटत आहेत.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्याच अथक प्रयत्नातून उभी असणारी ही दुमजली टुमदार वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आजही राधाबाई बिल्डिंग म्हणून ती परिचित आहे. टाऊन हॉलच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला असलेली ही वास्तू १२ ऑगस्ट १९२७ रोजी छत्रपती राजाराम महाराज यांच्याच कारकिर्दीत ‘दिवाण ऑफिस’ म्हणून करवीर संस्थानात कार्यान्वित झाली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची कन्या, छत्रपती राजाराम महाराज यांची बहीण, देवास संस्थानच्या महाराणी राधाबाई यांचेच नाव या वास्तूला देण्यात आले.
मिस्टर जे. आर. मार्टिन, सी. आय.इ., बी.ए., चीफ सेक्रेटरी टू गव्हर्मेंट लिटिकल डिपार्टमेंट बॉम्बे यांच्या हस्ते या वास्तूचे सुमारे ९८ वर्षांपूर्वी म्हणजेच १२ ऑगरट १९२७ ला मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले. या वास्तूसाठी छत्रपती राजाराम महाराज यांनी इलेक्ट्रिक दिव्यासाठी ९५० रुपये मंजूर केल्याचे आणि पुढील वर्षासाठी १००० रुपयांची विशेष आर्थिक तरतूद केलेल्या ४ मे १९२८ च्या तत्कालीन हुकमाची नोंद आजही सापडते.
ज्या छत्रपतींच्या कारकिर्दीत १९३१ ला कोल्हापूर संस्थानात तीन न्यायमूर्तीचे स्वतंत्र हायकोर्ट आणि त्यावर सुप्रीम कोर्टची स्थापना झाली. त्याच इमारतीच्या परिसरात स्वतः छत्रपती राजाराम महाराजांसह अनेक दिग्गज संस्थानिकांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली राधाबाई बिल्डिंगची वास्तू आज मात्र पुन्हा कात टाकीत आहे. या वास्तू परिसरात आता शेकडो गावातील लाखो लोकांना न्याय देण्याचे पवित्र कार्य सुरू होणार आहे.
दिवाण ऑफिस म्हणून बांधलेल्या या दगडी वास्तूला त्यावेळी रुपये ३५ हजार इतका खर्च आला होता. दोन्ही बाजूला षटकोनी आकाराचे मनोरे आणि त्याला वैशिष्ट्यपूर्ण कमानी, वर जाण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण जिने, प्रशस्त दालने, इमारतीच्या वरच्या बाजूला दर्शनी भागावर श्री राधाबाई बिल्डिंग अशी कोरलेली अक्षरे या स्वरूपाची ही वास्तू पुन्हा नवीन रुपडे धारण करीत आहे. वास्तूच्या प्रांगणामध्येच छत्रपती राजाराम महाराज यांचा संगमरवरी अर्धपुतळा बसवलेला आहे. हा पुतळा राजाराम महाराजांच्या हयातीतच उभा केलेला आहे.








