न्यायालयाचा निर्णय
वृत्तसंस्था/ बँकॉक
थायलंडच्या घटनात्मक न्यायालयाने पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा यांना बुधवारी निलंबित केले आहे. पंतप्रधानांच्या आठ वर्षाच्या कार्यकाळाची समीक्षा करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. मुख्य विरोधी पक्षाकडून दाखल याचिकेवर अंतिम निर्णय कधी देणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाहे.
सैन्य ‘जुंटा’चे प्रमुख म्हणून त्यांच्या कार्यकाळाला घटनात्मक स्वरुपात निर्धारित पंतप्रधानाच्या 8 वर्षांच्या कार्यकाळादाखल गणले जावे अशी मागणी विरोधी पक्षाने याचिकेद्वारे केली आहे. प्रयुथ यांच्या जागी उपपंतप्रधान प्रवित वोंगुसवान हे अंतरिम पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारू शकतात.
माजी सैन्यप्रमुख प्रयुथ यांनी निवडून आलेल्या सरकारच्या विरोधात बंड करत 2014 मध्ये सत्ता ताब्यात घेतली होती. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत पंतप्रधान म्हणून निवडून आले होते. ही निवडणूक तत्कालीन सैन्य राजवटीकडून तयार करण्यात आलेल्या घटनेच्या प्रारुपानुसार पार पडली होती.
थायलंडमध्ये दोन दशकांमध्ये वारंवार राजकीय उलथापालथ घडून येत आहे. या दोन दशकांमध्ये सत्तापालट अन् हिंसक विरोध देखील झाला आहे. देशात पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत निवडणूक होणार आहे. यापूर्वी प्रयुत चान-ओचा यांना मे महिन्यात अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले होते. सरकारवरील वाढते कर्ज आणि भ्रष्टाचारासाठी प्रयुत सरकारचे आर्थिक गैरव्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता.









