संसदेत मांडला पाच वर्षांचा लेखाजोखा : 17 व्या लोकसभेत अनेक पिढ्यांची प्रतीक्षा संपवल्याचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभार प्रदर्शनपर भाषणाने अधिवेशनाचे सूप वाजले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी गेल्या पाच वर्षातील सरकारच्या कार्याचा आढावा घेत सरकारने केलेल्या नवनव्या सुधारणापर कायद्यांवर भाष्य केले. तिहेरी तलाकपासून ते अनुच्छेद 370 हटवल्यामुळे अनेक पिढ्यांची प्रतीक्षा संपल्याचा दावा त्यांनी केला. तसेच जी-20 ने देशाची प्रतिष्ठा वाढवल्याचे नमूद करतानाच गेल्या पाच वर्षात देशात बऱ्याच सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले.
17व्या लोकसभेची उत्पादकता 97 टक्के होती. आता 18 व्या लोकसभेची सुऊवात नव्या विक्रमाने होणार असल्याचे सांगत पुढील 25 वर्षे खूप महत्त्वाची असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 17 व्या लोकसभेने अनेक मापदंड तयार केले. तिहेरी तलाकपासून स्वातंत्र्य दिले. अनेक पिढ्यांची प्रतीक्षा या लोकसभेत संपली. महिला शक्तीच्या दिशेने अनेक निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. या काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र, आव्हानांमुळेच मोठा आनंद आणि ताकद मिळत जाते असेही त्यांनी स्पष्टपणे कबूल केले. तसेच भारताच्या भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही काम करत राहू, अशी हमीही त्यांनी दिली.
गेल्या पाच वर्षांत देशसेवेसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. तरीही आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. 17 व्या लोकसभेला देश आशीर्वाद देईल, असा विश्वास असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे कौतुक केले. मानवजातीला शतकातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. कोविडमुळे सर्व खासदारांनी खासदार निधी सोडला. खासदारांच्या पगारात 30 टक्के कपात करण्यात आली, असे मुद्देही त्यांनी मांडले.
आपल्याला विकासाची कामे पुढे न्यावी लागतील. निवडणूक फार दूर नाही. लोकशाहीचा हा एक अत्यावश्यक पैलू आहे आणि आपण सर्वजण त्याचा अभिमानाने स्वीकार करतो. आपली लोकशाही साऱ्या जगाला चकित करत आहे. मला खात्री आहे की ती तशीच राहील. देवाने मला आशीर्वाद दिला आहे की जेव्हा आव्हाने येतात तेव्हा मी अधिक चमकते. आम्ही प्रत्येक आव्हानाचा यशस्वीपणे मुकाबला केला असून भविष्यातही नव्या दमाने वाटचाल सुरू ठेवण्याचा मनोदय व्यक्त केला.
‘सबका साथ-सबका विकास’
राम मंदिराबाबत आज सभागृहाने मंजूर केलेला ठराव येत्या पिढीला या देशाच्या मूल्यांचा अभिमान बाळगण्याची घटनात्मक शक्ती देत आहे. या गोष्टींचा अभिमान वाटण्याची क्षमता प्रत्येकामध्ये नसते हे खरे आहे. पण तरीही, या सभागृहात भविष्यासंदर्भात झालेल्या चर्चेत संवेदनशीलता, संकल्प आणि सहानुभूती या तिन्ही गोष्टींचा समावेश होतो. सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावनांमध्ये सबका साथ, सबका विकास हा मंत्र पुढे नेण्याचाही एक घटक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
सध्याच्या लोकसभेची शेवटची बैठक शनिवारी संपली. लोकसभा सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. या 17 व्या लोकसभेत काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवणे, महिला आरक्षण यांच्यासह अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यात आली. या लोकसभेत 97 टक्के उत्पादकता होती. त्यामध्ये विशेषत: महिला खासदारांचा सहभाग होता, असे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 17 व्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपल्या भाषणात सांगितले.
राममंदिर सोहळ्यावर चर्चा
अयोध्येतील राम मंदिराचे ‘ऐतिहासिक’ बांधकाम आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात नियम 193 अन्वये अल्पकालीन चर्चा घडवून आणण्यात आली. या चर्चेदरम्यान 22 जानेवारीला अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरात प्रभू रामाचा अभिषेक आणि पूजा पाहणे ऐतिहासिक होते, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक सदस्यांनी व्यक्त केल्या. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही चर्चेत भाग घेत आज कोणालाच उत्तर देणार नसल्याचे सांगितले. मला माझे विचार आणि जनतेचे विचार देशासमोर मांडायचे आहेत. 22 जानेवारी 2024 हा दिवस दहा हजार वर्षांहून अधिक काळ ऐतिहासिक दिवस राहील, असे शाह म्हणाले. 1528 पासून सुरू असलेल्या अन्यायाविऊद्धच्या लढ्याच्या विजयाचा हा दिवस होता असे ते म्हणाले. 22 जानेवारी 2024 हा संपूर्ण भारताच्या आध्यात्मिक चेतनेच्या नवजागरणाचा दिवस आहे. राम आणि राम चारित्र्याशिवाय देशाची कल्पनाच करता येत नाही. राम आणि रामाचे चारित्र्य हा भारतातील लोकांचा आत्मा आहे, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.
रामजन्मभूमीचा इतिहास मोठा : शहा
आंदोलनाबाबत अनभिज्ञ राहून देशाचा इतिहास वाचता येणार नाही, असे अमित शहा म्हणाले. 1528 पासून, प्रत्येक पिढीने या चळवळीला वचन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात ते प्रत्यक्षात आले आणि स्वप्न साकार झाले. रामजन्मभूमीचा इतिहास मोठा आहे. या लढ्यात राजे, संत, निहंग, कायदेतज्ञ यांचे योगदान आहे. आज या सर्व शूरवीरांचे विनम्र स्मरण करायचे आहे.
आम्ही जे बोलतो, ते करून दाखवतो : शाह
अमित शहा म्हणाले की, भाजप आणि पंतप्रधान मोदी जे बोलतात ते करतात. आम्ही 1986 पासून म्हणत होतो की अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले पाहिजे. काही लोक इथे प्रतिक्रिया देत होते. मला विचारायचे आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निर्णयाशी तुमचा संबंध आहे की नाही? तुम्ही निवाडा कसा टाळू शकता? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने भारताचे धर्मनिरपेक्ष चारित्र्य अधोरेखित झाले आहे. जगातील कोणत्याही देशात असे घडलेले नाही, जेव्हा बहुसंख्य समाजाने आपला विश्वास पूर्ण करण्यासाठी इतका संघर्ष केला आणि वाट पाहिली. लढा पूर्ण करून दाखवला. आता हवनात अस्थी टाकू नयेत. एकत्र या, हे देशाच्या भल्यासाठी आहे, असे आवाहनही शाह यांनी विरोधकांना केले.