साहित्याच्या दरातही वाढ : गणेश मंडळांवर अतिरिक्त खर्चाचा भार : काही वस्तूंवर जीएसटी लागू करण्यात आल्याने परिणाम
बेळगाव : लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने एक चैतन्यमय वातावरण तयार झाले आहे. परंतु, यावर्षी गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाल्याने गणेशमूर्तींच्या किमती कमालीच्या वाढल्या आहेत. यामुळे घरगुती मूर्तींसह मंडळाच्या मूर्तींसाठी यावर्षी अधिक खर्च करावा लागणार आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा होतो. घरोघरी गणपतीसह मंडळांमध्ये गणराय विराजमान होतात. आता अवघे पंधरा ते वीस दिवस शिल्लक राहिल्याने मंडळाचे कार्यकर्ते तसेच घरातील बालचमू गणरायाच्या आगमनासाठी धावपळ करताना दिसत आहे. काहींनी तर आपल्या डेकोरेशननुसार विविध रुपातील गणेशमूर्ती तयार करण्यास सांगितल्या आहेत. सार्वजनिक गणेशमूर्ती तयार झाल्या असून, आता पुढील आठवड्यापासून रंगकामाला सुरुवात होणार आहे.
कुशल कारागिर मिळणे झाले अवघड
गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारी माती, शाडू, रंग, मजुरी, वाहतूक खर्च वाढल्याने गणेशमूर्तींच्या किमती वाढल्या आहेत. त्यातच यातील काही वस्तूंवर जीएसटी लागू करण्यात आल्याने त्याचाही परिणाम गणेशमूर्तींवर झाला आहे. कुशल कारागिर मिळणे अवघड झाल्याने जादा दर देऊन बाहेरून कारागिर मागवत असल्याने यावर्षी गणेशमूर्तींच्या किमती वाढल्या आहेत. एक फुटाच्या गणेशमूर्ती हजार ते पंधराशे रुपये, दीड फुटाच्या पंधराशे ते दोन हजार रुपये, दोन ते चार फुटाच्या गणेशमूर्ती तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत विक्री केल्या जात आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी गणेशमूर्तींचा दर वाढला असल्याचे मूर्तीकारांकडून सांगण्यात येत आहे. सध्या शहरात सर्वत्र लहान गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्याने मूर्ती ठरविण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत आहे.
साहित्य-वाहतूक खर्च वाढल्याने समस्या
गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य तसेच वाहतुकीचा खर्च यावर्षी वाढला. तसेच कुशल कारगिर मिळणेही अवघड झाल्याने या सर्वाचा परिणाम गणेशमूर्तींच्या किमतीवर झाला आहे. यावर्षी गणेशमूर्तींच्या किमती थोड्या वाढवाव्या लागणार आहेत.
– विशाल गोदे (मूर्तिकार)










