पंतप्रधान मोदी यांचा घणाघात : गेल्या 9 वर्षांमध्ये नागरिकांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मागच्या सरकारच्या काळात देशात भ्रष्टाचार आणि घोटाळे यांचा कहर झाला होता, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्या काळात गरिबांच्या अधिकारांची लूट केली जात होती. तथापि, आता परिस्थितीत परिवर्तन झाले असून गरिबांच्या अधिकाराचे धन थेट त्यांच्या बँक खात्यांवर जमा होत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. परिणामी जनतेत समाधानाची भावना आहे, असे ठाम प्रतिपादन त्यांनी नवनियुक्त शिक्षकांसाठी आयोजित प्रशिक्षण आणि क्षमता संवर्धन कार्यक्रमात भाषण करताना केले.
हा कार्यक्रम मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील महात्मा गांधी उच्च माध्यमिक शाळेत सोमवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाग घेतला. त्यांनी गेल्या 9 वर्षांमध्ये देशाने विविध क्षेत्रांमध्ये साधलेल्या प्रगतीचा सविस्तर आढावा आपल्या भाषणात घेतला. विशेषत: देशाच्या गेल्या 9 वर्षांमधील आर्थिक प्रगतीवर त्यांनी भाषणात भर दिला.
करदात्यांमध्ये जागृती
यंदाच्या आर्थिक वर्षात विक्रमी संख्येने करविवरण पत्रे सादर करण्यात आली आहेत. आता या देशातील नागरिक कर भरणा करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेत आहेत. गेल्या 9 वर्षांमध्ये नागरिकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे या करविवरणपत्रांवरुन दिसत आहे. कारण, सरकार त्यांनी भरलेल्या करांचा उपयोग देशाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे करीत आहे, अशी शाश्वती त्यांना वाटत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या ‘अमृत काला’च्या प्रथम वर्षातच करसंकलनात मोठी वृद्धी होणे हा शुभसंकेत आहे, असे आश्वासक प्रतिपादन त्यांनी केले.
कोट्यावधी लोक गरिबीबाहेर
निति आयोगाने सादर केलेल्या नव्या अहवालानुसार गेल्या 5 वर्षांमध्ये 13.50 कोटी नागरिक दारिद्र्यारेषेच्या बाहेर पडले आहेत. 2014 मध्ये भारतीयांचे सरासरी उत्पन्न 4 लाख रुपये प्रतिवर्ष इतके होते. गेल्या नऊ वर्षांमध्ये ते 13 लाख रुपये प्रतिवर्ष या पातळीवर पोहचले आहे. सादर करण्यात आलेल्या करविवरण पत्रांच्या संख्येवरुन आणि करसंकलनावरुन ही बाब स्पष्ट होत आहे. नागरिक निम्न उत्पन्न गटातून आता उच्च उत्पन्न गटात समाविष्ट होत आहेत. देश आर्थिक प्रगतीच्या मार्गावर वेगाने अग्रेसर होत आहे, याचीच ही प्रचिती आहे. केंद्र सरकारच्या योग्य आर्थिक धोरणांचा हा परिणाम आहे. आगामी वर्षांमध्येही प्रगतीचा हा वेग स्थायी राहणार असून येत्या काही वर्षांमध्ये भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयास येणार आहे. हे लोकांचे यश आहे, असेही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
जीएसटी संकलनातही वाढ
भारतात वस्तू-सेवा करप्रणाली लागू होऊन आता पाच वर्षे झाली आहेत. आता या करसंकलनात मोठी वाढ होताना दिसत आहे. गेले सलग 10 महिने हे करसंकलन प्रतिमहिना 1 लाख 40 हजार कोटींहून अधिक होत आहे. यंत्रणा बळकट असल्याने करसंकलनात वाढ झाली आहे. यामुळे देशाच्या उत्पन्नात भर पडत असून विकासकामांसाठी आणि गरिबांसाठीच्या कल्याण योजनांसाठी अधिक धन उपलब्ध होत आहे, असे निरीक्षण अनेक अर्थतज्ञांनीही नोंदविले आहे.
देशहिताच्या योजनांवर भर
ड केंद्र सरकारकडून गेल्या 9 वर्षांमध्ये देशहिताच्या योजनांवर अधिक भर
ड करसंकलनात मोठी वाढ, नागरिकांच्या उत्पन्नातही तिपटीहून अधिक वाढ
ड भारताची जगात तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल









