कोल्हापूर / इम्रान गवंडी :
दुर्मिळ आजार मानला जाणाऱ्या गुलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस)च्या रूग्णांत दिवसागणिक वाढ होत आहे. जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यातच 38 जणांना जीबेएसची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे जिल्ह्यासह शहरात जीबीएसचे रूग्ण वाढत आहेत. दुसरीकडे मात्र, आरोग्य विभागाला जीबेएसचा मुळ स्त्रोत सापडत नसल्याने ठोस उपाययोजना करण्यावर मर्यादा येत आहेत.
जीबीएसची लागण झालेल्या 38 रुग्णांपैकी महापालिका क्षेत्रातील 13 तर ग्रामीण भागातील 25 रुग्णांचा समावेश आहे. दोन महिन्यात 4 जीबीएस बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यात 18 रुग्णांना डिस्चार्ज दिला असला तरी अद्यापही सीपीआरसह अन्य दवाखान्यात 16 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जीबीएसच्या 5 रूग्णांची स्थिती नाजूक असुन त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. उर्वरित 11 जणांची प्रकृती स्थिर आहे. यातील एकजण 02 वर उपचार घेत आहे. आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असली तरी जीबेएस का वाढत आहे? एखाद्या भागात वाढणाऱ्या जीबीएस रूग्णांचे कारण काय? याचा शोध घेण्यास आरोग्य विभागाला अपयश येत आहे.
महापालिका क्षेत्रात शहरातील शाहू मिल परिसरातील दोन वृद्धांचा उपचार सुरू असताना जीबीएसने मृत्यू झाला होता. यानंतर याच परिसरातील 17 वर्षीय मुलगा, एक बालिका, एक वृद्ध व वृद्धा असे चारजण जीबीएसची लागण झोलेले रूग्ण लागोपाठ दाखल झाले होते. त्यांचावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मनपा आरोग्य यंत्रणेकडून गेल्या आठ दिवसांपासून स्वच्छता मोहिम सुरू असुन व पाच दिवसापूर्वी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. मात्र, त्याचा अहवाल अद्यापही प्राप्त झोलेला नाही. तपासणीसाठी घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यामध्ये कोणताही प्रकारचा दोष आढळला नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जीबीएसचा प्रादुर्भाव झाला कसा हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
- फेब्रुवारी महिन्यात दुपटीने वाढ
आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार जानेवारी महिन्यात 12 रूग्णांना जीबीएसची लागण झाली होती. फेब्रुवारी महिन्यात बाधितांमध्ये वाढ होऊन 26 जणांना जीबीएसची लागण झाली. जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये रूग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. यामध्ये आणखी वाढ होऊ नये, यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
- ठोस कारण सापडत नसल्याने संभ्रम
मनपा व जिल्हास्तरावर आरोग्य विभागाकडून घरोघरी जीबीएसबाबत जनजागृती सुरू आहे. नागरिकांचा सर्व्हेही केला जात आहे. मात्र, ज्या भागात जीबीएसचे रूग्ण सापडत आहेत त्याचे कारण अद्यापही स्पष्ट होत नसल्याने नागररीकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मुळ स्त्राsत सापडल्याशिवाय प्रादुर्भाव रोखणे कठीण होत आहे.
- रूग्ण आढळलेले शहर व करवीर परिसरातील भाग
राजारामपुरी, मोरे–माने नगर कळंबा, यादवनगर, शाहू मिल कॉलनी, मार्केड यार्ड, जाधववाडी, कदमवाडी, शिये, जोतिर्लिंग कॉलनी जरगनगर, गांधीनगर.
- दुषित पाण्यातून लागण : प्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज
जीबेएसचे रूग्ण वर्षभर आढळतात. दूषित पाण्यातून याची लागण होते. याला प्रतिबंध करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज असते. त्यामुळे आहारामध्ये ताजे, सकस अन्न धान्याचा समावेश करावा. सीपीआरमध्ये यावरील इम्युनोग्लोबीनचे औषध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. खासगी रूग्णालयात यासाठी लाखोंचा खर्च येतो. सीपीआरमध्ये यावरील सर्व उपचार मोफत केल जात आहेत. वेळेत उपचाराने हा आजार बरा होतो. कोणतेही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सीपीआर व शासकीय रूग्णालयांशी संपर्क साधावा. संपूर्ण जिल्ह्dयात याचा सर्व्हे सुरू असुन पाण्याचे नमुनेहा तपासणीसाठी घेतले जात आहेत.
डॉ. अनिरूद्ध पिंपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी








