आग किंवा दाह आणि पाणी हे एकमेकांच्या विरोधातील असतात, हे आपल्याला महिती आहे. आग विझविण्यासाठी किंवा दाह कमी करण्यासाठी पाण्याचा उपयोग केला जातो. आपल्याला भाजल्यास त्या जागी थंडगार पाणी ओता, असा सल्ला देण्यात येतो. तथापि, पाण्यानेच दाह होत असेल, अशा व्यक्तीने करावे तरी काय, हा प्रश्न आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एरिन कॅसिडी नामक महिलेला पाण्याचीच अॅलर्जी आहे. तिच्या त्वचेला पाणी लागले, की तिला असह्या दाह होतो आणि वेदना होतात. त्यामुळे ती पाण्याचा संपर्क टाळते.
या महिलेने टीव्ही वरच्या ‘धिस मॉर्निंग’ या कार्यक्रमात आपली ही व्यस्था स्पष्ट केली आहे. वयाच्या 14 व्या वर्षापासून आज वयाच्या 24 व्या वर्षापर्यंत ती या विचित्र समस्येही दोन हात करीत आहे. तिच्या त्वचेला पाणी लागले की तिला असह्या वेदना होतात. सारे शरीर जळत आहे, हे वाटते. बाहेरच्या पाण्याचे तर सोडाच, पण तिचे स्वत:चे अश्रू जरी तिच्या गालावरुन ओघळले, तरीही तिच्या त्वचेचा दाह होतो. त्यामुळे अश्रूही तिला वरच्यावर टिपून घ्यावे लागतात. अशी ाr पाण्याची अॅलर्जी कोट्यावधी लोकांमधून एखाद्याला असू शकते, असे डॉक्टरांचे मत आहे. अशा प्रकारची अॅलर्जी दुर्मिळातली दुर्मिळ असल्याने तिच्यावर प्रभावी उपचारही नाहीत. केवळ पाण्यापासून दूर राहणे हाच एक उपाय उरला आहे.
पाण्याच्या स्पर्शाने तिच्या त्वचेवर रॅशेस बनतात. ते साधारणत: 20 ते 30 मिनिटे राहतात. साधारणत: 1 तासानंतर तिचा दाह संपतो आणि त्वचा पूर्वीसारखी होते. पण ही 30 मिनिटे तिला मरणप्राय वेदना होतात. असे का होते यावर सध्या संशोधन होत आहे. काही तज्ञांच्या मते ही पाण्याची अॅलर्जी नसून पाण्यात नैसर्गिकरित्या काही क्षार मिसळलेले असतात, त्यांची ही अॅलर्जी आहे. बालपणी तिला अॅलर्जी नव्हती. त्यामुळे पुढे ती अपोआप जाईल, असेही काहींचे मत आहे.









