स्मार्ट सिटी पाहणी पथकाकासमोर विकास कामांबद्दल नागरिकांची नाराजी
बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेची पाहणी करण्यासाठी आलेले केंद्रीय पथकाचे अधिकारी बेकायदेशीर व निकृष्ट दर्जाची कामे पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारी लक्षात घेऊन स्मार्ट सिटी योजना अधिकाऱ्यांनी आयोजित केलेली पत्रकार परिषद ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असणारी स्मार्ट सिटी योजना बेळगाव शहरामध्ये राबविण्यात आली आहे. योजनेचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे पाहणी करण्यासाठी केंद्रीय वसती आणि नगरविकास सचिवालयाचे एडीजी (मीडिया) राजीव जैन व राष्ट्रस्तरावरील पत्रकारांचे पथक शहराच्या भेटीवर आले होते. या भेटीदरम्यान स्थानिक नागरिकांकडून अधिकाऱ्यांना योजनेमध्ये झालेल्या गैरकारभाराची माहिती दिली. त्यामुळे अधिकाऱ्यांना योजनेची पूर्ण माहिती घेण्याऐवजीच काढता पाय घ्यावा लागला. तर आयोजित केलेली पत्रकार परिषद ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की स्थानिक अधिकाऱ्यांवर ओढवली आहे.
विकासकामांबद्दल तीव्र नाराजी
रविवारी हे पथक स्मार्ट सिटी योजनेची पाहणी करण्यासाठी आले होते. दरम्यान, शहरातील जागरुक नागरिकांनी अधिकाऱ्यांसमोर राबविण्यात आलेल्या विकासकामांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली असून नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने शहरांचा विकास करण्यासाठी योजना राबविल्या असल्या तरी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून यामध्ये हस्तक्षेप करण्यात आल्यामुळे योजना बारगळल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नागरिकांकडून प्रश्नांचा भडिमार
शहराची पाहणी केल्यानंतर विश्वेश्वरय्यानगर येथील स्मार्ट सिटी योजनेच्या कमांड सेंटर कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांवर स्थानिक नागरिकांकडून प्रश्नांचा भडिमार करण्यात आल्यामुळे नियोजित पत्रकार परिषद रद्द करणे भाग पडले. पत्रकार परिषदेत मोठा वादंग माजण्याची शक्यता असल्याने पत्रकार परिषद रद्द करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. याबाबत योजना अधिकारी सईदाबानू बळ्ळारी यांच्याशी संपर्क साधला असता केंद्रीय पथक योजनेच्या पाहणीसाठी आले होते. नियोजित पत्रकार परिषद काही कारणास्तव रद्द करण्यात आली असून माहिती खात्याकडून अधिकाऱ्यांचे म्हणणे कळवू, असे त्यांनी सांगितले.









