सत्ताधारी-विरोधकांची जोरदार मोर्चेबांधणी, भाजपतर्फे नड्डा, राजनाथ सिंग यांच्यावर मोठी जबाबदारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राज्यसभा निवडणुकीची ‘रणधुमाळी’ पार पडल्यानंतर आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक तयारीला लागले आहेत. एकीकडे विरोधक एकवटले असून संयुक्त उमेदवार जाहीर करण्यासाठी एकापाठोपाठ एक बैठका सुरू आहेत. तर दुसरीकडे आता भाजपनेही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाजपने आपल्या दोन बडय़ा नेत्यांना सर्व पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी दिली आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे दोन्ही नेते सर्व प्रादेशिक पक्षांशी चर्चा करून निवडणुकीची रणनीती तयार करणार आहेत. त्याचबरोबर विरोधकही आपली रणनिती बनवत असल्यामुळे आगामी राष्ट्रपतीपदाची निवडणूक रंजक होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलै रोजी होणार आहे. अशा स्थितीत राजकीय पक्षांमधील खलबते वाढली आहेत. आपला उमेदवार विजयी व्हावा, यासाठी पुन्हा एकदा विरोधी एकजुटीचा आवाज घुमू लागला आहे. 15 जूनला कॉन्स्टिटय़ूशन क्लबमध्ये विरोधी पक्षांची सर्वसाधारण सभा असून त्यादरम्यान उमेदवाराच्या नावावर चर्चा होणार आहे. येत्या 10 दिवसांत विरोधक आपल्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करतील, असे बोलले जात आहे. विरोधकांनी एका उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले तर 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी हा पहिला ‘ऐक्याचा पाया’ ठरू शकतो, असे राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे.
भाजपकडून प्रसिद्धीपत्रक
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी रविवारी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. या प्रसिद्धीपत्रकानुसार, भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी नियुक्त केले आहे. हे नेते एनडीए आणि यूपीएमधील सर्व घटक पक्ष तसेच इतर राजकीय पक्ष आणि अपक्षांशी सल्लामसलत करतील. दोघेही लवकरच सल्लामसलत करण्याची प्रक्रिया सुरू करतील, असे प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
ममतांची दिल्लीत खलबते
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रविवारी ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीला महत्त्वाच्या पक्षांचे नेते उपस्थित होते. आता या मुद्यावर विरोधी पक्षांची सर्वसाधारण सभा 15 जून रोजी होणार आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांना पत्र लिहून 15 जून रोजी होणाऱया प्रस्तावित बैठकीत सहभागी होण्याची विनंती केली आहे. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेअंती विरोधी पक्ष राष्ट्रपती निवडणुकीसाठी रणनीती तयार करू शकतील, असे दिसत आहे. या बैठकीमध्ये काँग्रेसच्यावतीने मल्लिकार्जुन खर्गे सहभागी होऊ शकतात.
विरोधकांच्या ऐक्मयाला येचुरींचा मोठा धक्का
राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी विरोधकांची एकजूट करण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत बोलावलेली विरोधी पक्षांची बैठक एकतर्फी असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे. अशा एकतर्फी प्रयत्नांचे विपरीत परिणाम होतील आणि विरोधकांच्या ऐक्यालाच हानी पोहोचेल, असे ते म्हणाले. सामान्यतः अशा बैठका परस्पर सल्लामसलत केल्यानंतरच बोलावल्या जातात. पण ममता बॅनर्जींची ही कृती एकतर्फी आणि अतिशय असामान्य आहे. अशा निर्णयांमुळे विरोधी ऐक्मयाचे नुकसानच होईल, असेही ते पुढे म्हणाले.
डी. राजा यांचाही ममतांना दणका
सीताराम येचुरी यांच्याशिवाय भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी राजा यांनीही ममता बॅनर्जींना मोठा धक्का दिला आहे. कोणतीही सल्लामसलत न करता अशाप्रकारे बैठक बोलावणे योग्य नाही, असे ते म्हणाले. पूर्वनियोजनाविना अशाप्रकारच्या बैठका आयोजित केल्याने गोंधळ आणि गैरसमज निर्माण होऊ शकतात, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.
शिवसेना काय म्हणाली?
ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीबाबत बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी आम्हाला 15 जूनच्या बैठकीचे निमंत्रण मिळाले आहे. त्यावेळी आपण अयोध्येत असल्यामुळे आमच्या पक्षाचे एक प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत, असे सांगितले.
रालोआची स्थिती मजबूत
लोकसभा आणि राज्यसभा तसेच अनेक राज्यांच्या विधानसभांमधील ताकद पाहता आगामी निवडणुकीत सत्ताधारी भाजपप्रणित आघाडीने नामनिर्देशित केलेल्या उमेदवाराचा विजय सुनिश्चित मानला जात आहे. एनडीए बहुमताच्या अगदी जवळ आहे. त्यासाठी बीजेडीचे नवीन पटनायक आणि वायएसआरसीचे जगनमोहन रेड्डी यांच्या पाठिंब्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन पटनायक आणि जगनमोहन रेड्डी यांचीही भेट घेतली आहे. मात्र, उमेदवाराचे नाव समोर आल्यानंतरच पाठिंब्याबाबत निर्णय घेण्याचे दोघांनी सांगितले आहे. त्यादृष्टीने आता जे. पी. नड्डा आणि राजनाथ सिंग रणनिती आखत आहेत.









